
मुंबई: मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी ३ ते ४.३० वाजे दरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये , असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि किनारी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहेत. अपेक्षित उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आले आहेत. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने ‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’ ची पथके रवाना करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळेल, याची काळजी घ्यावी, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तत्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून महामार्गावरील मलबा हटविण्यात यावा. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन संभाव्य दरड कोसळणाऱ्या ठिकाणी पथके सज्ज ठेवावीत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर यावेळी अनपेक्षित ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून दरडीचा मलबा तत्काळ हटवण्यात यावा. कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची शक्यता
अरबी समुद्रावर बनत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात उद्या ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सुमारे ३०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. कुठेही जीवित हानी होणार नाही, याबाबतही दक्ष रहावे, अशा सूचना फडणवीसांनी दिल्या.
ही परिस्थिती लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. बंद होऊ शकणारे रस्ते, दरडी कोसळण्याची ठिकाणी अशा सर्वंकष बाबींचा विचार करून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे. पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पर्यटकांनी जावू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
शून्य बळीचे उद्दिष्ट
सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. पुढील ४८ तास ‘शून्य बळी’ हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत एकाच दिवसात ३०० झाडे कोसळली
मुंबई शहरात एका महिन्याच्या सरासरी इतका पाऊस अवघ्या चार दिवसांत नोंदवण्यात आला आहे. विशेषतः भरतीच्या काळात अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर आपत्तीजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. काल मुंबई शहरात ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहताना निदर्शनास आले. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. साधारणपणे संपूर्ण चार महिन्यांच्या मान्सूनमध्ये जितकी झाडे पडतात, त्यापैकी जवळपास ३०० झाडे एकाच दिवशी पडली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
८ जुलैच्या रात्रीपर्यंत रेडअलर्ट
येत्या तीन दिवसांत, म्हणजे ८ जुलैच्या रात्रीपर्यंत हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे. दरम्यान, भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
‘ वर्क फ्रॉम होम’ करू द्या, अन्यथा कारवाई
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा. खाजगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना फ्रॉम होम जे सवलत द्यावी. असे न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून संबंधित विभागाचा आढावा घेतला.
बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, बृहन्मबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव (नगरविकास) के. एच. गोविंदराज, प्रधान सचिव (जलसंपदा) एकनाथ डवले,मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सचिव (आरोग्य) ई. रविंद्रन, संचालक श्री. चव्हाण आदी उपस्थित होते
मुंबईसह कोकणात मुसळधार
आज ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यात १५१.२ मिलिमीटर पाऊस झाला असून मुंबई शहरामध्ये १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात २३६.६, ठाणे जिल्ह्यात १५८.७ रत्नागिरीमध्ये १५२.३ पावसाची नोंद झाली आहे.
