वरिष्ठ संशोधन अधिकारी, अनुवादक व भाषा संचालनालय परीक्षांचे प्रवेश प्रमाणपत्रे एमपीएससीच्या संकेतस्थळावर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गुरूवार, दिनांक ०१ डिसेंबर रोजी नियोजित वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ  व अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, गट-क  या दोन संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या आसन क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक, परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही, उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम, कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व / अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Computer Based Examinations>Mock Test’ येथे एक वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही मॉकटेस्ट ही केवळ सरावासाठी असून प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी व गुण संबंधित परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार असणार आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिवांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!