छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, दोन गटाच्या कार्यकर्त्यांची एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून आज छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) जळगाव रोडवरील मराठा मंदिरमध्ये मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या बैठकीत वाद झाला. सुरूवातीला ही बैठक शांततेत सुरू होती. ६० ते ७० जण उपस्थित असलेल्या या बैठकीत अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन ही बैठक आयोजित करण्यात आल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आणि बैठकीत वादाला तोंड फुटले. टीव्ही९ मराठीने हे वृत्त दिले आहे.

बैठकीत वादाला तोंड फुटल्यानंतर विकी पाटील या तरूणाला बेदम मारहाण करण्यास सुरूवात झाली. बाळू औताडे या तरूणाने सुरूवातीला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर इतरही तरूणांनी मारहाण केली. मारहाणीनंतर ही बैठक उधळली गेली मात्र बराच काळ राडा सुरू राहिला. या बैठकीत झालेल्या या राड्यामुळे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित होऊ शकला नाही.

लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी झाली. त्यातील एक क्षण.

काहीजण राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन येथे आले होते. समाजातील कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज मिळाला नाही. हे काही ठराविक जण समाजाचे मालक झाले आहेत का? असा सवाल या बैठकीसाठी आलेल्या एका कार्यकर्त्याने म्हटले आहे. आम्हीही अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी लढत आहोत. परंतु यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावले नाही. आम्ही मराठा समाजाचे घटक नाहीत का? असा सवाल या कार्यकर्त्याने केला.

या बैठकीत ज्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, त्यापैकी एका कार्यकर्त्याने सांगितले की, मराठा समाजातील काही गरजवंतांनी ही बैठक बोलावली होती. मला या बैठकीबाबत एका संदेश मिळाला. त्यामुळे मी येथे आलो. परंतु काही लोक ही बैठक कोणी आयोजित केली? ही बैठक कोणी बोलावली? असे प्रश्न विचारत आमच्यावर तुटून पडले. काही लोकांची येथे दडपशाही सुरू आहे. आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असेही हा कार्यकर्ता म्हणाला.

दरम्यान, या राड्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या बैठकीतच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत राडा घालण्यात आल्यामुळे या बैठकांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *