औरंगाबादः दारूच्या नशेत मित्राच्या बायकोशी कारमध्ये अश्लील चाळे केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले औरंगाबाद पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक उपायुक्त विशाल ढुमे यांना आज अखेर निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या शनिवारी मध्यरात्री औरंगाबाद शहराच्या सिडको भागातील पाम रेस्टॉरंटपासून नारळी बाग परिसरात हाय प्रोफाईल ड्रामा झाला होता. त्यात एसीपी विशाल ढुमे यांनी मित्राच्या पत्नीचा विनयभंग केल्याची फिर्याद सिटी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. सिटी चौक पोलिसांनी ढुमे यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
या प्रकरणानंतर पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी ढुमे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांकडे पाठवला होता. अखेर आज गृह मंत्रालयाने ढुमे यांच्या निलंबानाचे आदेश जारी केले आहेत. १८ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात ढुमे यांना १६ जानेवारीपासूनच निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन काळात त्यांनी औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय सोडू नये,त्यांनी तसे केले तर त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची वेगळी कारवाई केली जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.