समृद्धी महामार्गावर जालना ते छत्रपती संभाजीनगरदरम्यानची वाहतूक ‘हे’ पाच दिवस बंद, अशी असेल पर्यायी वाहतूक व्यवस्था


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पाच काही तासांसाठी बंद राहणार आहे. या महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समीशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवार, १० ऑक्टोबर ते गुरुवार, १२ ऑक्टोबरदरम्यान दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत आणि  व  बुधवार, २५ ऑक्टोबर ते गुरूवार, २६ ऑक्टोबरदरम्यान दुपारी १२ ते ३ यावेळात बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळवले आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समीशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा १० ते १२ ऑक्टोबर (मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीनही दिवस) तर दुसरा टप्पा २५ व २६ ऑक्टोबर (बुधवार व गुरुवार असे दोनही दिवस) असेल.

त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान (मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीनही दिवस) दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत तर दुसऱ्या टप्प्यात २५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान (बुधवार व गुरुवार असे दोनही दिवस) दुपारी १२ ते दुपारी ३ या वेळेत बंद करण्यात येणार आहे. इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल.

असा असेल पर्यायी वाहतूक मार्ग

समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आयसी-१४) ते सावंगी इंटरचेंज (आयसी-१६) दरम्यान समृद्धी महामार्गवरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज आयसी-१४ मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे-राष्ट्रीय महामार्ग ७५३ अ (जालना-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. आयसी-१६ (छत्रपती संभाजीनगर)(औरंगाबाद) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.

तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी-१६ (छत्रपती संभाजीनगर)(औरंगाबाद) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्धदिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी-१४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळवले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!