न्यूजटाऊन इम्पॅक्टः सिद्धार्थ महाविद्यालयातील आर्थिक हडेलहप्पीचा सहसंचालकांनी मागवला खुलासा, प्रशासक नेमण्याची तयारी?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सिल्लोड शिक्षण संस्थेच्या जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेल्या आर्थिक अनियमिततेची उच्च शिक्षण संचालनालयाने गंभीर दखल घेतली असून छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सिद्धार्थ महाविद्यालयाने केलेल्या गंभीर स्वरुपाच्या आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची तयारी उच्च शिक्षण संचालनालयाने चालवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. न्यूजटाऊनने या आर्थिक हडेलहप्पीचा पर्दाफाश केला होता.

जनार्दन म्हस्के हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या सिल्लोड शिक्षण संस्थेच्या जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेल्या गंभीर आर्थिक अनियमिततेबाबतचे वृत्त ‘न्यूजटाऊन’ने २२ सप्टेंबर रोजी केला होता. सेवानिवृत्त दिवंगत प्राचार्य अशोक आत्माराम काकडे यांच्या ७ व्या वेतन आयोगानुसार जीपीएफ व महागाई भत्त्याच्या फरकाच्या रकमा महाविद्यालयाच्या वेतन खात्यात जमा होऊनही त्या रकमा त्यांच्या वारसांकडे हस्तांतरित न करता महाविद्यालय प्रशासनाने गडप केल्याचे न्यूजटाऊनच्या या वृत्तात म्हटले होते.

आवश्य वाचाः जाफ्राबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने दडपले प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेचे १७ लाख ५९ हजार ७३१ रुपये!

माजी प्राचार्य अशोक काकडे यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या एकूण १० लाख ९५ हजार ९६६ रुपये थकीत रकमेपैकी केंद्र सरकारचे ५० टक्के म्हणजेच ५ लाख ४७ हजार ४८४ रुपये आणि राज्य सरकारच्या पाच हप्त्यांपैकी पहिला, दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम ३ लाख २८ हजार ४९० रुपये अशी एकूण ८ लाख ७५ हजार ९७४ रुपये महाविद्यालयाच्या वेतन बँक खात्यात जुलै २०२२ रोजीच जमा झाली. राज्य सरकारच्या चौथ्या हप्त्याची रक्कम १ लाख ९ हजार ४९६ रुपये ऑगस्ट २०२३ रोजीच महाविद्यालयाच्या वेतन खात्यात जमा करण्यात आली.

हेही वाचाः जाफ्राबादच्या सिद्धार्थ कॉलेजकडून अल्पसंख्यांक दर्जाचा दुरूपयोग; फायदे लाटले पण बौद्ध अल्पसंख्यांकांच्या हित रक्षणाकडे हेतुतः दुर्लक्ष!

प्राचार्य अशोक काकडे यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची एकूण रक्कम ९ लाख ८५ हजार ४७० रुपये महाविद्यालयाच्या वेतनासाठी असलेल्या प्राचार्यांच्या नावे बँक खात्यात जमा करूनही महाविद्यालयाने ही रक्कम प्राचार्य काकडे यांच्या कायदेशीर वारसदार असलेल्या पत्नी विद्या काकडे यांच्याकडे हस्तांतरित करणे अनिवार्य होते. परंतु तसे न करता महाविद्यालयाच्या प्रशासनाने ही रक्कम गडप करून टाकली.

न्यूजटाऊनच्या या वृत्ताची गंभीर दखल घेत विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून या गंभीर स्वरुपाच्या आर्थिक अनियमिततेबाबतचा स्वयंस्पष्ट खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले असून महाविद्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी प्राचार्यांची राहील असे म्हटले आहे.

विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून प्राचार्य काकडे यांच्या सातव्या वेतन आयोगाची रक्कम संवितरित करूनही संबंधितास ही रक्कम वितरित करण्यास विलंब का झाला? ही रक्कम संबंधितास वितरित न करणे ही आर्थिक अनियमितता असून या रकमा वितरित का करण्यात आल्या नाहीत, याचा स्वयंस्पष्ट खुलासा सात दिवसाच्या आत करावा, असे विभागीय सहसंचालकांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या निर्देशांत म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सात दिवसात खुलासा देण्याचे निर्देश दिले. त्यासंबंधीचे हे पत्र.

हा मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार!

प्राचार्य अशोक काकडे हे २००९ पासून सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. प्राचार्यपदी कार्यरत असताना डॉ. काकडे यांनी महाविद्यालयासाठी प्रचंड मेहनत घेतली. महाविद्यालयाची इमारत उभी केली. यूजीसीकडून संस्थेला १२८/१२एफ दर्जा मिळवून दिला. अनुदान मिळवून दिले. २०२१ मध्ये त्यांनी  प्रकृतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. स्वेच्छानिवृत्तीनंतर वर्षभरातच त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा महाविद्यालयाच्या वेतन खात्यात जमा झाल्या.

किमान माणुसकी म्हणून तरी महाविद्यालय प्रशासनाने या रकमा त्यांच्या वारसांना देणे अनिवार्य होते. परंतु प्राचार्य काकडे यांच्या वारसांना या रकमेचा थांगपत्ता लागणार नाही, अशा अविर्भावात महाविद्यालय प्रशासनाने ही रक्कम गडप केली. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच हा प्रकार आहे. परंतु न्यूजटाऊनने या प्रकाराचे बिंग फोडले.

प्रशासक नेमण्याची तयारी?

सिल्लोड शिक्षण संस्थेच्या जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेली आर्थिक अनियमितता ही अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. वेतनाशी संबंधित आर्थिक अनियमितता ही कोणत्याही पातळीवर क्षम्य नाही. त्यामुळे या आर्थिक अनियमिततेची उच्च शिक्षण संचालनालयाने गंभीर दखल घेतली असून या आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची तयारीही केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविद्यालयावर प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर या महाविद्यालयातील एकूणच अनियमिततेची झाडाझडती घेतली जाण्याचीही शक्यता आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचे पुरावे न्यूजटाऊनकडे आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!