खा. हेमंत पाटील म्हणाले: ‘एससी,एसटीचे अधिकारी औकात नसताना शासकीय रुग्णालयात येत आहेत, मागासवर्गीय डॉक्टर माजले आहेत!’


नांदेडः ‘या शासकीय रुग्णालयात एससी, एसटीचे अधिकारी औकात नसताना येत आहेत. मी यापूर्वी वाकोडे नावाच्या एससीच्या डॉक्टरला सुद्धा असेच काम करायला लावले होते. हे मागासवर्गीय डॉक्टर माजले आहेत,’ हे शब्द आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे हिंगोलीचे ‘सवर्ण’ खासदार हेमंत पाटील यांचे!

मंगळवारी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून शौचालयाची सफाई करायला लावल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ऍट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

मूळचे हदगाव तालुक्यातील तळ्याची वाडी येथील रहिवाशी असलेले आणि सध्या नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता असलेले डॉ. शामराव रामजी वाकोडे हे आंध या जातीचे असून त्यांची जात अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडते.

डॉ. वाकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खा. हेमंत पाटील यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३५३, ५०६, ५००, ३४ आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(एम), ३(१)(यू), ३(१)(व्हीए) आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था( हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० च्या कलम ४ नुसार  नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉ. शामराव वाकोडे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात खा. हेमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला दुष्ट हेतूने जातीय भावनेतून कसा शारीरिक व मानसिक छळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले याबाबतची आपबितीच कथन केली आहे. सवर्ण खासदार हेमंत पाटील यांनी एका अनुसूचित जमातीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर केलेला अत्याचार या जबाबातून समोर आला आहे. डॉ. वाकोडे यांची आपबिती त्यांच्याच शब्दांत…

‘दिनांक ३/१०/२०२३ रोजी मी सकाळी ९ वाजता सुमारास कार्यालयामध्ये आलो असता आमचे वरिष्ठ अधिकारी राजीव निवतकर (आयुक्त वैद्यकीय शिक्षण) व मा. मंत्री वैद्यकीय शिक्षण यांचा शासकीय दौरा आमच्या रुग्णालयामध्ये असल्यामुळे मी वार्डातील व कार्यालयातील कामकाज करत होतो. यावेळी वेगवेगळे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते हे कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी येत होते. दि. ३/१०/२०२३ रोजी दुपारी १२.३०  वा. सुमारास हेमंत पाटील व त्यांचे सोबत १० ते १५  इतर लोक व काही प्रेस रिपोर्टर घेवून माझ्या शासकीय केबिनमध्ये आले व मला एकदम रागाने खुर्चीतून उठण्यास सांगितले व अचानक मला पूर्वसूचना न देता माझ्या केबिनमध्ये जनसमुदायसह घुसून दहशदीचे वातावरण निर्माण केल्याने मी भयभीत होवून मानसिक तणावग्रस्त स्थितीत माझ्या खुर्चीतून उभे राहून बाजूला सरकलो तेव्हा हेमंत पाटील हे गैरकायदेशीर माझ्या खुर्चीवर बसले व माझा व माझ्या पदाचा अवमान केला’,  असे वाकोडे यांनी या जबाबात म्हटले आहे.

‘माझ्या केबिनमध्ये हेमंत पाटील त्यांच्या सोबतचे सहकारी मला जोरजोरात बोलून माझ्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करत होते व रुग्णालयात झालेल्या मृत्यूसंबंधी विचारणा करीत होते. त्यामुळे मला मानसिक त्रास झाला. त्यानंतर त्यांनी जेथे मृत्यू झाले त्या वॉर्डला भेट द्यायची म्हणून वार्ड दाखवण्यासाठी जाताना माझ्या कार्यालयाच्या बाहेर बाथरुम किंवा संडास कोठे आहेत ते मला पाहायचे आहेत, असे म्हणून मला शौचालय रूम दाखवण्यास सांगितले. मी त्यांचे म्हणण्याप्रमाणे शौचालय रूम दाखवली. त्यावेळेस माझ्या कार्यालयाचे कर्मचारीसुद्धा सोबत होते. मी शौचालय रूम उघडून दाखवताच हे शौचालय घाण कसे? आणि हे शौचालय तुम्ही साफ करा असे म्हणून मला धमकावले,’ असेही डॉ. वाकोडे यांनी या जबाबात म्हटले आहे.

‘आमच्या कार्यालयातील वर्ग चारचे कर्मचारी समोर येवून ते शौचालय आम्ही साफ करतो असे म्हणाले असता त्यांनी त्यास पुढे न येवू देता तुझ्या साहेबांना असे काम करायला पाहिजे. ते फुकट पगार घेतात व त्यांनी हे साफ करायला पाहिजे, असे म्हणून धमकावून तेथे मला जबरदस्तीने शौचालय साफसफाई करण्यास लावले व त्यांच्या सहकार्यांनी मीडिया, प्रेस यांना माझे चित्रिकरण करायला लावले व माझी मानहानी करण्यासाठी शौचालय साफ करीत असल्याची बातमी सर्व प्रसार माध्यमातून प्रसारित केली,’ असे डॉ. वाकोडे या जबाबात म्हणतात.

‘हेमंत पाटील व त्यांच्या सहकार्यांनी व संबंधित प्रेस रिपोर्टर यांनी अनधितकृतपणे माझ्या कार्यालयात घुसून शासकीय कामात अडथळा निर्माण करुन दहशतीचे वातावरण निर्माण करून मला सार्वजनिक ठिकाणी शौचालय साफ करण्याचे काम बळजबरीने करावयास लावल्याने माझ्या मनाला वेदना झाल्या तसेच माझी सार्वजनिक ठिकाणी अवहेलना केल्याने माझा मानसिक छळ होवून मला त्रास झाला. मला शौचालय बळजबरीने साफ करावयाला लावलेले वृत न्यूजमध्ये प्रसिद्ध केल्याने माझे कुटुंबीय व माझी जनमानसात बदनामी झाली’, अशी वेदनाही डॉ. वाकोडे यांनी या जबाबात बोलून दाखवली आहे.

‘मला शौचालय साफ करतांना पाहून माझे चतुर्थ श्रेणी कर्मचारी डोळ्यात अश्रू आणून माझ्या हातातील झाडू घेवून आम्ही शौचालय साफ करतो असे म्हणत असतांना हेमंत पाटील यांनी व त्यांच्या सहकार्यानी दूष्ट भावनेने शौचालय हाच साफ करेल, असे मला अपमानस्पद बोलत होते. या शासकीय रुग्णालयात एससी, एसटीचे अधिकारी यांची औकात नसतांना येत आहेत. मी यापूर्वी वाकोडे नावाच्या एससीच्या डॉक्टरलासुद्धा असेच काम करायला लावले होते. हे मागासवर्गीय डॉक्टर माजले आहेत, असे अर्वाच्च भाषेत ते शिवीगाळ करत होते’, असे डॉ. वाकोडे यांनी या जबाबात म्हटले आहे.

‘एकंदरित हेमंत पाटील व त्यांच्या सहकार्यांची ही अपराधाची कृती जातीय द्वेष भावनेची होती. तसेच त्यानंतर वार्ड क्रमांक ६ येथे नेवून माझ्याकडून सदरील वार्डातील शौचालयाची जबरदस्तीने साफसाफाई करून घेतली व मला अपमानित केले. हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेचे कार्यरत खासदार असून त्यांच्यापासून व त्यांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या व माझ्या कुटुंबीयाच्या जीवितास धोका आहे’, असेही डॉ. वाकोडे यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!