औरंगाबादः पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे म्हणजे लोकरंगभूमी, नागर रंगभूमी आणि लोककला यांचा त्रिवेणी संगम असल्याचा सूर स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित लोककला कार्यशाळेत मान्यवरांच्या भाषणातून निघाला.
पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, लोककला अकादमी आणि स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे माजी संचालक व लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, विद्यमान संचालक डॉ. गणेश चंदनशिवे, लोककलेचे अभ्यासक व पत्रकार डॉ. शेषराव पठाडे, शाहीर अंबादास तावरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर यांची उपस्थिती होती.
साने गुरुजींच्या सहवासात वाढलेले शाहीर साबळे यांचा जन्मच जणूकाही लोककलांसाठी झाला होता. त्यांनी प्रथमच मोबाइल थिएटरची संकल्पना मांडली. मुक्तनाट्य, प्रहसन, वगनाट्य आणि लोकगीतांचे विविध प्रकार त्यांनी रसिकांपुढे आणले. गिरणीकामगारांसाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनजागृतीचे कामही आजच्या कलावंतांसाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले.
शाहीर डॉ. शेषराव पठाडे यांनी लोककलांचा अभ्यास करताना शाहीर साबळे यांचे स्थान सर्वोच्च स्थानी असल्याचे सांगितले. शाहिरांना करावा लागणाला संघर्ष शाहीर चंदनशिवे यांच्यासह शाहीर साबळेंनाही करावा लागला. मात्र, त्यातून त्यांनी आपल्या लोककलांमध्ये वैविध्य आणले असे सांगून त्यांनी लावणीसम्राट स्वर्गीय ज्ञानोबा उत्पात यांची ‘वाटलं होतं तुम्ही याल’ ही लावणी सादर करून लोककलांचे जतन आणि संवर्धनाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांचे सप्रयोग विवेचन सर्वांना भावले.
डॉ. प्रकाश खांडगे यांनी शाहीर साबळे यांच्या मैत्रीच्या ३५ वर्षांतील कालखंडातील अनेक किस्से सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या चरित्रातील ‘कसं काय वाट चुकला?’ हा एक भाग निखील वागळे यांच्या अक्षर दिवाळी अंकात छापून आला. तो वाचून शाहीर आत्माराम पाटील आणि शाहीर साबळे तासभर रडत असल्याची ह्रदयस्पर्शी आठवण त्यांनी सांगितली. तसेच एका समारंभात सलील चौधरी आणि शाहीर साबळे दोन दरवाजांतून सभागृहात येत असता प्रख्यात निवेदक अमिन सयानी यांनी बंगाल को मिलने महाराष्ट्र आया असे समर्पक भाष्य केल्याचे सांगून शाहीर साबळे विचारवंत लोककलावंत असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात शाहीर अंबादास तावरे यांनी शाहीर साबळे यांना साथ केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच तत्कालीन सरकारने त्यांच्यावर सोपवलेली कामे पार पाडण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रतील शाहिरांची फौज उभी केल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. किशोर सिरसाठ यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे बलखंडे, पाईकराव यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. रामचंद्र झाडे, प्रा. बसवेश्वर बिरादार, प्रा. युवराज सुतार, प्रा. सुनील भारोडकार, कमलाकर रेणुके आदींसह शहरातील नामवंत लोककलावंत आणि महाविद्यालयीन युवक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.