राज्यपाल कोश्यारींच्या डोक्यावरून ‘काळी टोपी’ पहिल्यांदाच गायब!


मुंबईः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) ओळख असलेली ‘काळी टोपी’ कायम डोक्यावर मिरवणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या डोक्यावरून आज पहिल्यांदाच ही काळी टोपी गायब झाल्याचे पहायला मिळाले.

डोक्यावर काळी टोपी, धोती, सदरा आणि त्यावर स्लीव्ह नसलेले जॅकेट अशा पेहरावात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायम वावरत असतात. हा पेहरावच त्यांची ओळख बनलेला आहे. कोश्यारी हे कायम डोक्यावर काळी टोपी घालूनच सार्वजनिक जीवनात वावरत आलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरील आरएसएसची काळी टोपी हा अनेकदा टिकेचा विषयही ठरली आहे. परंतु तरीही राज्यपाल कोश्यारी यांनी ही काळी टोपी काही त्यांच्या डोक्यावरून कधी उतरवली नव्हती. मात्र आज त्यांनी ही काळी टोपी डोक्यावरून उतरवलेली पहायला मिळाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी कोश्यारी यांनी पहिल्यांदाच त्यांच्या डोक्यावरील काळी टोपी उतरवलेली दिसली. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

राज्यपालांच्या डोक्यावरील काळ्या टोपीवर अशी झाली टिकाः

 काळ्या टोपीखाली डोके असेल तर…उद्धव ठाकरेंची टीकाः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि त्यांच्या सरकारमध्ये चांगलाच ताणतणाव निर्माण झाला होता. राज्यपाल कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ‘हिंदुत्वाची’ आठवण करून दिली होती. त्यावरून ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या डोक्यावरील काळ्या टोपीवर सडकून टीका केली होती. ‘सकाळी मोहन भागवत यांनी हिंदीतून देशाला उद्देशून एक भाषण केले. हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करनेवाले लोग है, हे त्यांचे वाक्य आहे. माझे नाही. तेव्हा जे त्यांना मानणारे आहेत, त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर का डोके असेल तर त्या डोक्याला म्हणावे विचार करा, हे हिंदुत्व तुम्हाला पटते का? सरसंघचालकाकडून जरा हिंदुत्व शिकून घ्या,’ अशी टीका ठाकरे यांनी कोश्यारींवर केली होती.

काळी टोपी हटाव-राष्ट्रवादीचे आंदोलनः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ नोव्हेंबर २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा असे लिहिले फलक हातात घेतले होते. काळी टोपी काळे मन, हेच भाजपचे अंतरमन, भाज्यपाल हटावो, महाराष्ट्र बचाओ, अशा घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांच्या डोक्यावरील काळी टोपी टिकेचे लक्ष्य ठरली होती.

काळी टोपी घालून संघाचे पूर्णवेळ कार्य-मिटकरीः ऑगस्ट २०२२ मध्येही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळीही त्यांच्या डोक्यावरील काळ्या टोपीवर विरोधकांनी सडकून टीका केली होती. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून काळी टोपी घालून पूर्णवेळ संघाचे कार्य केले. त्यांच्या डोक्यावर अजूनही काळी टोपी कायम आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या आराध्य दैवतांवर वारंवार अश्लील टिप्पणी करून स्वतः प्रकाश झोतात राहण्याचे काम केले, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावेळी केली होती.

 कोश्यारी मात्र म्हणतात ही काळी टोपी उत्तराखंडाचीः दरम्यान, आपल्या डोक्यावरील काळी टोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नसून उत्तराखंडमधील लोकांची पारंपरिक टोपी आहे, असा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याआधीच केला आहे. २९ ऑगस्ट २०२१ रोजी ‘भारतीय संसद में भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या कार्यक्रमात बोलताना कोश्यारींनी हा खुलासा केला होता. उत्तराखंडमधील लोकांची पारंपरिक टोपी असलेली माझी काळी टोपी रा. स्व. संघाशी संबंधित असल्याचे राहुल गांधी यांना वाटते, असे कोश्यारी म्हणाले होते. संसदेत राहुल गांधी यांनी मला तुम्ही काळी टोपी का घालता? असा प्रश्न केला होता. उत्तराखंडमधील नागरिकांची ही टोपी आहे, असे उत्तर मी त्यांना दिले होते. त्यावर तुम्ही संघाचे आहात म्हणून ती टोपी घालता असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर मी संघाचा आहे, मात्र ही टोपी उत्तराखंडची आहे, असे उत्तर राहुल गांधींना दिल्याचे कोश्यारी यांनी यावेळी भाषणात नमूद केले होते.

दरम्यान, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी  त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली.

आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली. त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *