‘राम सेतु’च्या अस्तित्वाचे कुठलेही ठोस पुरावे नाहीतः मोदी सरकारचे संसदेत स्पष्टीकरण, वाचा काय आहे नेमका वाद?

नवी दिल्लीः  तामीळनाडूच्या किनारपट्टीवरून थेट श्रीलंकेला जोडणारा पुल ‘राम सेतु’ रामाच्या वानर सेनेने खरेच बांधला होता की ही केवळ दंतकथा आहे?, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळते. मात्र खुद्द मोदी सरकारनेच राम सेतुच्या अस्तित्वाचे कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत आणि बेटावर जे अवशेष आढळलेले आहेत, ते पुलाचेच असल्याचा खात्रीशीर दावा करता येत नाही, असे स्पष्टीकरण संसदेत दिले आहे.

हरियाणातील भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी या संदर्भात  गुरूवारी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान व अवकाश संशोधन मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, ज्या जागेवर पौराणिक रामसेतु होता, असे दावे केले जातात, त्या ठिकाणाची उपग्रह छायाचित्रे घेण्यात आली आहेत. या छायाचित्रात उथळ पाण्यात बेट आणि दगड-चुना दिसत आहे. परंतु तेच राम सेतुचे अवशेष आहेत, असा दावा केला जाऊ शकत नाही.

 राम सेतुच्या संदर्भात जे प्रश्न आहेत, त्याबाबतीत मी सांगू इच्छितो की, त्याच्या शोधाबाबत आमच्या काही मर्यादा आहेत. कारण याबाबतीतील इतिहास जवळपास १८ हजार वर्षांपूर्वींचा आहे आणि इतिहासकालीन दाखल्यांचा विचार करता या पुलाची लांबी ५६ किलोमीटर इतकी आहे.

तंत्रज्ञानाच्या साह्याने आम्ही काही तुकडे, बेट आणि एक प्रकारच्या लाइम स्टोनच्या ढिगाऱ्याची ओळख पटवू शकलो आहोत. परंतु हाच पुलाचा भाग आहे किंवा त्याचे अवशेष आहेत, असे आम्ही म्हणू शकत नाही. मात्र त्या ठिकाणी आढळून आलेल्या अवशेषांमध्ये एकप्रकारचे सातत्य आपल्याला दिसून येते. त्यावरून आपल्याला नक्कीच काहीच अंदाज बांधता येतील, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

 त्या ठिकाणी नेमके कोणते बांधकाम होते, हे नेमके सांगता येणे कठीण आहे. पण तेथे काही प्रत्यक्ष किंवा काही अप्रत्यक्ष खुणांवरून आणि अवशेषांवरून मात्र असे म्हणता येईल की तेथे एक बांधकाम होते. पण ते रामसेतुचेच बांधकाम होते, असा खात्रीशीर दावा करता येणे कठीण आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले.

अशी आहे राम सेतुची दंतकथाः भारताच्या दक्षिणपूर्वेकडील रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या पूर्वोत्तरेला असलेल्या मन्नार द्वीप दरम्यान चुन्याच्या उथळ ढिगाऱ्याची साखळी आहे. भारतात यालाच राम सेतु तर जगभरात त्याला ऍडम्स ब्रीज म्हणजेच आदमचा पुल या नावाने ओळखले जाते. या चुन्याच्या ढिगाऱ्याची लांभी जवळपास ३० मैल (४८ किलोमीटर) आहे.

 हा पुल मन्नारची खाडी आणि पाक खाडीला वेगळे करतो. या भागात समुद्र अतिशय उथळ आहे. त्यामुळे या भागात मोठ्या नावा किंवा जहाजे चालवणे अतिशय कठीण आणि धोकादायक आहे. पंधराव्या शतकापर्यंत या ढाच्यावरून रामेश्वरमहून मन्नार खाडीपर्यंत चालत जाता येऊ शकत होते, असे सांगितले जाते. मात्र समुद्री चक्रीवादळामुळे येथील समुद्र खोल झाला आणि त्यामुळे या पुल समुद्रात बुडाला, असेही सांगितले जाते.

मुस्लिमांसाठी आदमचा पुलः भारतातील हिंदूंसाठी राम सेतु असलेली ही जागा मात्र मुस्लिमांसाठी ऍडम्स ब्रीज म्हणजेच आदमचा पुल आहे. जन्नतमधून काढल्यानंतर पैगंबर आदम यांनी सर्वात आधी श्रीलंकेतील एका डोंगरावर पाऊल ठेवले होते, अशी इस्लाममध्ये धारणा आहे. कुराणमध्ये आदमचा उल्लेख २५ वेळा झालेला आहे. ते ९० फूट ऊंच होते आणि त्यांच्या पावलाच्या खुणा आजही आदम की चोटीवर पहायला मिळतात. आदमने श्रीलंकेहून भारतात येण्यासाठी एक पुल तयार केला होता, त्यालाच आदमचा पुल म्हणतात, असे इस्लामिक संशोधकांचे म्हणणे आहे.

२००७ मध्येच केंद्र सरकारने घेतले होते शपथपत्र मागेः २००७ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात ‘राम सेतु’चे ऐतिहासिक आणि पौराणिक अवशेष असल्याचे कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. तेव्हा केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार होते. त्यावरून मोठे राजकीय वादंग माजले होते. भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केंद्राच्या या भूमिकेला विरोध केला होता आणि डॉ. मनमोहन सिंगांचे सरकार हिंदूविरोधी असल्याची टिका केली होती. त्यामुळे सरकारने हे शपथपत्र मागे घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!