मुंबईः ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाबरोबरच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. स्वतः चव्हाण यांनीच ही माहिती दिली. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. चव्हाण यांचा राजीनामा काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.
अशोक चव्हाण यांनी आज सकाळीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतली होती. त्यानंतर मी पुन्हा येतो, असे सांगून अशोक चव्हाण हे नार्वेकरांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळानी अशोक चव्हाण यांनी ट्विट करून राजीनाम्याची घोषणा केली.
आज सोमवार दि. १२ फेबुर्वारी २०२४ रोजी मी ८५- भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवलेल्या राजीनाम्यात अशोक चव्हाण यांनी लेटरहेडवर विधानसभा सदस्याच्या आधी पेनने माजी असे लिहिले आहे. त्यामुळे त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा दिला आणि नंतर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट होत आहे.
आमदारकी आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाऊन कमळ हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भाजपमध्ये आल्यानंतर अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काही भाजप नेत्यांनी चव्हाणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यास विरोध केला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चव्हाणांना आगामी राज्यसभा निवडणुकीचे तिकिट देऊन खासदारकी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.