हसन मुश्रीफांची गाडी फोडणारा अजय साळुंके हा संभाजी भिडेंचा कट्टर समर्थक, जहाल हिंदुत्ववादी कार्यकर्ता; शिऊर पोलिसांत अनेक गुन्हे


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मुंबईत मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेलेल्या आकाशवाणीजवळच्या आमदार निवासाबाहेर उभी असलेली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची कार आज सकाळी काही मराठा आंदोलकांनी फोडली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलेला अजय साळुंके हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचा रहिवासी असून तो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा कट्टर समर्थक आणि जहाल हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्या आणि ओबीसीत समावेश करा, या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून उग्र स्वरुप धारण करत हिंसक बनले आहे. त्यातून राज्यात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

मुंबईत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन मराठा आंदोलकांनी आकाशवाणीजवळच्या आमदार निवासाबाहेर उभ्या असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अजय साळुंके, संतोष निकम आणि दीपक सहानपुरे या तीन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. सध्या पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी अजय साळुंके हा आंदोलक वैजापूर तालुक्यातील टुणकी गावचा रहिवाशी असून तो हिंदवी जनक्रांती सेना या संघटनेचा संस्थापक आहे. शिवाय तो टुणकी- दस्कुली ग्रुप ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे.

अजय साळुंके हा आंदोलक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रचंड प्रभावाखाली असून तो त्यांचा कट्टर समर्थक आणि जहाल हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, अशी माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.

विविध मुद्द्यांवर आंदोलने करण्यात अजय साळुंके हा आंदोलक नेहमीच आघाडीवर असतो. विशेषतः स्टंट करण्यात हा कार्यकर्ता पटाइत आहे, असे सांगण्यात येते. मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्नांसाठी अजय साळुंके पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना अजय साळुंके यांनी सप्टेंबर महिन्यात शिऊर बंगला येथे अन्नत्याग आमरण उपोषण केले होते.

या उपोषणाच्या ११ व्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी भेट देण्यास येणार असल्यामुळे नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अजय साळुंके यांनी केले होते. तशी पोस्ट त्यांनी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर केली होती.

१४ ऑक्टोबर रोजी आंतवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अजय साळुंके यांच्या नेतृत्वात टुणकी गाव ते आंतरवाली सराटी अशी मशाल रॅली काढण्यात आली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ काही मराठा आमदार-खासदारांनी राजीनामे देऊ केले आहेत. परंतु हे आमदार-खासदार राजीनाम्याचे नाटक करून षडयंत्र रचत आहेत, अशी टीका अजय साळुंके यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

टुणकी गाव आणि शिऊर बंगला परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय साळुंके यांच्यावर संभाजी भिडे यांचा प्रचंड प्रभाव असून ते त्यांचे कट्टर समर्थक आहेत आणि जहाल हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत. अजय साळुंके यांच्याविरोधात शिऊर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचीही माहिती समोर येत आहे.

अजय साळुंके यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी केलेली फेसबुक पोस्ट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!