मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून हिंसक रुप धारण केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे. मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी सकाळी आकाशवाणी येथील आमदार निवासाबाहेर उभी असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या आमदार निवासाबाहेर हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून हे तिघेही छत्रपती संभाजीनगरचे आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलन उग्र बनले आहे. बीड आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पोलिसांनी जालना, बीड आणि धाराशिवमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. ही परिस्थिती निवळत नाही तोच मराठा आरक्षणाची धग आता मुंबईत पोहोचली आहे. मराठा आंदोलकांनी आकाशवाणी आमदार निवासबाहेर उभी असलेली मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली.
एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा तरूणांनी मुश्रीफांच्या गाडीच्या काचा फोडल्या. मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या आमदार निवासाबाहेरच हा प्रकार घडल्यामुळे मंत्रालय परिसरातही या आंदोलनाची धग पोहोचू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडणारे तीनही मराठा आंदोलक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांना त्यांची ओळख पटली आहे. अजय साळुंखे, संतोष निकम आणि दीपक सहानपुरे अशी या तिघांची नावे आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. अजय साळुंके हे वैजापूर तालुक्यातील टुणकी- दस्कुली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत.
आकाशवाणीजवळच्या आमदार निवासाबाहेर हसन मुश्रीफांची गाडी फोडल्यानंतर कागलमधील मुश्रीफांच्या घराबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची तोडफोड केली होती.
मुंबईतील मंत्रालयाचा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो. मंत्रालयाच्या गार्डन गेटच्याच बाजूला आकाशवाणी आमदार निवास आहे. या आमदार निवासाच्या खाली मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी उभी होती. मुश्रीफांची गाडी हेरूनच मराठा आंदोलकांनी तिची तोडफोड केली.