मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीमध्ये समावेश कराः मनोज जरांगे पाटलांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम


जालनाः मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या समितीचे काम आता बंद करा. या समितीला आता पाच हजार पानांचा पुरावा मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा. १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही, असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला दिला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी सरकारला हा अल्टिमेटम दिला आहे. या सभेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी हजेरी लावली.

 तुमचा मुलगा म्हणून सांगतोय. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. केंद्राला आणि राज्याला सांगतो, आज मराठ्यांचे आग्या मोहोळ शांत आहे. हे आग्या मोहोळ एकदा उठले तर मग हे आरक्षण घेतल्याशिवाय रहायचे नाही. गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून देशाला अन्नधान्य पुरवतो. त्यांची लेकरे आरक्षणापासून वंचित राहता कामा नये. माझेही लेकरू नोकरीला लागले पाहिजे, हे गरीब मराठ्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने मराठा आरक्षण जाहीर करावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आम्ही सरकारला शेवटची विनंती करतो. मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या समितीचे काम आता बंद करा. तुमचे आणि आमचे ठरले होते. चार दिवसांत कायदा पारित होणार नाही. आम्हा एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारित करतो, असे आश्वासन तुम्ही दिले होते. आता पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जास्त काळ वाट पाहणार नाही

राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाची विनाकारण हालअपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घ्यावा. सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीमध्ये समावेश केल्याचा निर्णय जाहीर करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहण्याची आता आमची तयारी नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

…तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू

महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिले तरीही चालेल. पण आम्हाला टिकणारे आरक्षण हवे आहे. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले आहेत. त्यात आम्ही ४० दिवस काहीही विचारणार नाही, हे आम्ही सांगितले होते. आम्ही तो शब्द पाळला. आता सरकारच्या हातात आणखी १० दिवस आहेत. या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण  पाहिजे. जर आरक्षण दिले नाही तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

मोदींनी फडणवीसांना समज द्यावी

याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यात मराठ्यांचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. खालचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या अंगावर घातले जात आहे. आपल्याला पुढील आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच करायचे आहे. याच मार्गाने मराठा समाज आरक्षण मिळवेल, हा शब्द आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!