छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी (१४ ऑक्टोबर) जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे सभा होणार असून या सभेला होणारी गर्दी लक्षात पोलिसांनी जालना, बीडकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत.
आंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवर मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. सभेचे हे स्थळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या सभेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासूनच वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांची वाहतूक आज शनिवारी रात्री (१४ ऑक्टोबर) १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. सर्व वाहनधाकरांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
- छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)- पाचोड-शहागडमार्गे बीडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- बिडकीन- पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जातील.
- बीड-पाचोडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे (औरंगाबाद) येणारी वाहतूक बीड, पाडळसिंगी फाटा, पारगाव, बोधेगाव, पैठण, बिडकीनमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे (औरंगाबाद) येईल.
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ते बीडकडे जालनामार्गे जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बदनापूर, जालना, घनसावंगीमार्गे बीडकडे जाईल.
- जालना-अंबड वडीगोद्री- शहागडमार्गे बीडकडे जाणारी वाहतूक जालना, अंबड, घनसावंगी, आष्टी, माजलगावमार्गे बीडकडे जाईल.
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पाचोड, वडीगोद्री, शहागडमार्गे बीडकडे जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, उमापूर मार्गे बीडकडे जाईल.
- बीड, शहागड, वडीगोद्रीमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे (औरंगाबाद) जाणारी वाहतूक बीड, उमापूर, पैठणमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे (औरंगाबाद) जाईल.
- बीड, शहागड, वडीगोर्दीमार्गे जालन्याकडे जाणारी वाहतूक बीड, माजलगाव, आष्टी, घनसावंगी, अंबड मार्गे जालन्याकडे जाईल.
जालना-बीड बससेवा सुरू
या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल केले असले तरी नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून जालना-बीड बससेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे. अंबड येथून घनसावंगी, आष्टी, माजलगावमार्गे बीडकडे बसेस जाणार आहेत. मार्गात बदल झाल्यामुळे प्रवास भाड्यात मात्र वाढ होणार आहे. वडीगोद्री, अंकुशनगर, शहागड आणि गेवराईमार्गे बससेवा मात्र बंद राहणार आहे.