अमरावतीः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सुजात आंबेडकर यांनी अमरावतीमधून लोकसभा लढवावी, असा ठरावच ‘वंचित’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला असून त्या दृष्टीने जय्यत तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे धाबे दणाणले आहे.
सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत अद्यापही स्पष्ट बोलणी झालेली नाही आणि जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर झालेला नाही. अशातच राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच अमरावती येथे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून सुजात आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव मंजूर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अमरावतीत शनिवारी वंचितची बैठक पार पडली. या बैठकीत अमरावती लोकसभा मतदारसंघावर वंचितने दावेदारी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अमरावतीमधून निवडणूक लढवावी, असा ठरावही या बैठकीत घेण्यात आल्याचे गवई म्हणाले.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. नंतर त्यांनी भाजपशी घरोबा केला आणि भाजपही जेवढ्या आक्रमकपणे घेत नाही, त्याहीपेक्षा जास्त आक्रमकपणे हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्याचे पहायला मिळाले आहे. सुजात आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात उतरले तर नवनीत राणा यांच्याशी त्यांची काट्याची लढत होईल, असा अंदाज आहे.
आनंदराज आंबेडकरही इच्छूक
एकीकडे वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमधून सुजात आंबेडकरांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरलेला असतानाच याच लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हेही निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगितले जाते. आनंदराज आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे दोघेही अमरावतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर अमरावतीत आंबेडकर विरुद्ध आंबेडकर असा सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे. तसे झालेच तर दोन आंबेडकरांमधील लढतीत विद्यमान खासदार नवनीत राणा यांचाच फायदा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून बळवंत वानखडे?
दुसरीकडे महाविकास आघाडीत मागच्या वेळी अमरावती मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला होता. याहीवेळी काँग्रेसने या मतदारसंघावर दावेदारी केली आहे. दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे हे अमरावतीमधून काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू आहे. परंतु काँग्रेसच्या उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे बळवंत वानखडे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे.