संभाजीनगरच्या शासकीय बी. एड. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद, किरीट सोमय्या आणि प्रशासनाबाहेरची व्यक्ती…..


छत्रपती संभाजीनगर: वर्तमानपत्राच्या आणि शिक्षण बीट सांभाळणाऱ्या पत्रकारांच्या दृष्टीने शासकीय बी.एड. महाविद्यालय तसे दुर्लक्षित किंवा बातम्या नसणारे ड्राय क्षेत्र आहे. तिथे ३१ मार्च २०२३ ला एक अजब किस्सा घडला. अगदी किरीट सोमय्यांना जसे ईडी आणि आयटीच्या रेड कुठे पडणार आहेत? हे जसे आधी कळते, तसेच काहीसे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदाच्या बाबतीत झाले. किस्सा मोठा गंमतीशीर आणि खात्रीलायक आहे.

त्याचे असे झाले की, शासकिय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्या ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांनी प्राचार्यपदाचा पदभार कोणाला द्यावा, याबाबत विचारणा केली होती. वास्तविक शासनालाही हे माहीत असले पाहीजे, कारण शासनाची अध्यापक महाविद्यालयेच तशी संख्येने कमी आहेत. त्यामुळे तिथे असणाऱ्या प्राचार्यांची संख्याही मर्यादित आहे. पण लक्ष देईल, ते शासन कसले. तर ३१ मार्चला जेवणानंतर म्हणजे आफ्टर लंच काहीच निरोप शासनाच्या म्हणजेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांकडून आला नाही.

तिथे असणारे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हेही छत्रपती संभाजीनगरचे असूनही. ज्यावेळी अशा प्रकरणांमध्ये शासन निर्णय येत नाही किंवा घेत नाही, अशा परिस्थितीत सेवा ज्येष्ठतेनुसार जो प्राध्यापक ज्येष्ठ असेल त्याला तो पदभार दिला जावा, असे संकेत आहेत. पण तिथे असणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यपकाने प्राचार्यपद नको असल्याचे लेखी शासन दरबारी कळवले होते. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या प्राचार्यांच्या समोर पुन्हा पेच उभा राहिला. त्यात त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सेवागौरव सोहळ्याची तयारी सुरू झाली होती.

शासन दरबारी पूर्वी संचालकांचा पदभार सांभाळलेले ज्येष्ठ आणि सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या हस्ते त्यांचा गौरव ठरला होता. ही सगळी धावपळ, पळापळ सुरू असतांनाच एका प्रथितयश दैनिकाचे संचालक असणारे गृहस्थ तिथे उपस्थित झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि हास्य हे स्पष्ट करीत होते, की त्यांना काहीतरी गुपित माहित आहे.

ज्या पद्धतीने किरीट सोमय्या कारवाईपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हसत-हसत सांगतात की ईडीची पुढची कारवाई कोणावर आणि काय असेल. तसेच हास्य या कार्पोरेट जगतातील संचालकांच्या चेहऱ्यावर होते. पण आपल्या मनातील भाव लक्षात येऊ नये, म्हणून त्यांनी विद्यमान प्राचार्यांचा सत्कार आणि गौरव करण्यासाठी आपण इथे आलो आहोत, हे सांगायला सुरवात केली. पण त्यांचा या महाविद्यालयाशी काय संबंध? तर त्यांच्या सुविद्य पत्नी याच महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यामुळे ते तिथे प्रगटले होते. हे गृहस्थ वर्तमानपत्राशी संबंधित असल्याचा एक ताठा त्यांच्या चेहऱ्यावर कायम होता. तो त्यावेळी पण दिसत होता.

ज्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदाच्या नियुक्तीची दखल घेतली नव्हती, त्या विभागातून त्या वर्तमानपत्राच्या संचालकांच्या पत्नीच्या नावाची घोषणा झाली. सेवागौरव सोहळा सुरू असतांनाच ही घोषणा केली गेली. त्यामुळे त्यांनी सोबत आणलेले हारतुरे आपल्याच पत्नीला घातले आणि सेवानिवृत्त होणाऱ्या प्राचार्यांना हार तर सोडा साधा पुष्पगुच्छही दिला नाही.

 यावेळी त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. त्यामध्ये ते वारंवार उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या नावाचा उल्लेख करित होते. आपल्याला चार वाजताच हे नाव कळले होते. हेही ते वारंवार सांगत होते. त्यातून तिथे उपस्थित असणाऱ्यांना ते संदेश देत होते, की आता आम्हाला संचालकांचा आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे माझ्या प्रभारी प्राचार्यपदी कार्यरत असणाऱ्या पत्नीला कुणी त्रास देऊ नये.

आता हे प्रभारी प्राचार्यपद त्यांना कसे मिळाले? आणि त्याची माहिती त्यांना कशी मिळाली?  त्याचाही किस्सा रंगतदार आहे. ते ज्या वर्तमानपत्रात आहेत, त्याची व्याप्ती राज्यभर आहे. या वर्तमानपत्राच्या मुंबईत असणाऱ्या आवृत्तीचे संपादक हेही छत्रपती संभाजीनगरचे आहेत. त्यांनी आपल्या संपादकपदाचा वापर करित प्रभारी प्राचार्यपदाची ही माळ त्या संचालकांच्या पत्नीच्या गळ्यात टाकण्याची विनंती छत्रपती संभाजीनगरच्याच असणाऱ्या संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना केली. त्यांनी ती पूर्ण केली, अशी ती कथा आहे. त्यामुळे त्या संचालकांनी प्रभारी प्राचार्यपदासाठी लावलेली फिल्डिंग कामाला आली अगदी भाजपचे नेते किरीट सोमय्यांसारखेच. या प्रभारी प्राचार्यपदाच्या बातम्याही त्या संचालकांनी सगळ्या स्थानिक दैनिकांमध्ये छापूनही आणल्या. सध्या शिक्षण क्षेत्रात हा किस्सा चांगलाच चर्चिला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!