भरसभेत पंकजा मुंडेंना थांबवून भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केले आधी भाषण, बीडमध्ये दोन प्रचारसभांतील प्रकार

बीडः भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे त्यांच्या पक्षात खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. बीड जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल दोन प्रचारसभांमध्ये घडलेल्या प्रकारामुळे या चर्चेवर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन सभांमध्ये पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्यानंतर त्यांना थांबवून ‘मी आधी बोलणार’  म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषण केले. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतच हा प्रकार घडल्यामुळे हा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे.

मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी बीड जिल्ह्यांत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रतीम मुंडे यांच्या या  उपस्थितीत या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.

गेवराई आणि बीड येथे आयोजित या प्रचारसभांमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांचे भाषण संपल्यानंतर भाषणासाठी पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर करण्यात आले. निवेदकाने नाव उद्घोषित केल्यानंतर पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उठले आणि मी आधी बोलणार असे म्हणत त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि भाषणही सुरू केले. त्यामुळे पंकजा मुंडे यांना नाईलाजाने खाली बसावे लागले.

पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत आहे. पंकजा मुंडेंना भाजप नेत्यांकडून हेतुतः डावलण्यात येत असल्याचा आरोपही पंकजांचे समर्थक करत आले आहेत. शुक्रवारी पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यातच भाजप प्रदेशाध्यक्षांकडून असा प्रकार घडल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 बावनकुळे म्हणाले पंकजा आणि पक्षाला बदनाम करणारा गट भाजपातचः बीड जिल्ह्यातील हा व्हिडीओ व्हायरल होऊन त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आज वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट भाजपमध्येच आहे. तेच हीच बदनामी करत आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिले. ती माझी जबाबदारी आहे. मी काही उपकार केलेले नाहीत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. या फक्त चर्चाच आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *