मोदींचे भाषण सुरू असताना शेतकरी म्हणाला कांद्यावर बोला, पण मोदींनी दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा; कमी वेळेत उरकले भाषण!


नाशिकः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा घेतली. मोदींचे भाषण सुरू असतानाच प्रेक्षकांमधून ‘मोदीजी आता कांद्यावर बोला,’ अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे मोदींनी अचानक भाषण थांबवले आणि जयश्रीरामचा नारा दिला. अचानक प्रेक्षकांमधून सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे लक्ष विचलित झालेल्या मोदींनी कमी वेळेतच आपले भाषण उरकून घेतले.

या प्रचारसभेत मोदींनी इंडिया आघाडीसह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर टिकास्त्र सोडले. नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे मोदी म्हणाले. प्रेक्षकांमधून मोदी, मोदी, अशा घोषणा ऐकायला येत होत्या.

काँग्रेस सत्तेत आली तर ते अर्थसंकल्पातील १५ टक्के भाग अल्पसंख्यांकासाठी राखून ठेवतील, असे वक्तव्य मोदी यांनी केले. तेवढ्यात प्रेक्षकांमधून मोदीजी आता कांद्यावर बोला, अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे लक्ष विचलित झालेल्या मोदींनी क्षणभर भाषण थांबवले. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही चुळबुळ सुरू झाली. त्यानंतर मोदींनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या.

त्यानंतर मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ते आपल्या योजनांची माहिती द्यायला लागले आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण काय केले, हे सांगू लागले. परंतु हे सुरू असताना प्रेक्षकांमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुरूच असल्याने मोदींनी इतर सभांपेक्षा या सभेत कमी वेळेत आपले भाषण उरकले.

नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी मोदींच्या सभेत घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन सभास्थळापासून बाहेर नेले. परंतु शेतकरी कांद्यावर बोला म्हणत असताना मोदींनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे त्यांची ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!