निवडणूक संपताच बसणार खिशाला चाट! तुमच्या मोबाईलचे रिचार्ज महागणार, वाचा किती रुपयांचा बसणार फटका?

नवी दिल्लीः लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला मोठी चाट बसणार आहे. लोकसभा निवडणुका संपल्याबहरोबर मोबाईल रिचार्ज आणि बिल महागण्याची शक्यता असून टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकांनंतर सर्वसामान्यांना मोबाईल बाळगणे महागाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर मोबाईल फोनच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. टेलिकॉम कंपन्या अलिकच्या वर्षांत चौथ्यांदा टॅरिफ म्हणजेच रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोबाईलवर बोलणे महागात पडणार आहे.

ब्रोकरेज फर्म ऍक्सिस कॅपिटलच्या अहवालानुसार टेलिकॉम कंपन्यांना लवकरच टॅरिफच्या किंमतीत लक्षणीय वाढ करू शकतात. या कंपन्यांनी ५-जीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना नफा वाढवण्याची गरज आहे. यामुळे ग्राहकांचा मोबाईलवरील खर्च शहरी घरांसाठी एकूण खर्चाच्या ३.२ टक्क्यांवरून ३.६ टक्क्यांपर्यंत तर ग्रामीण ग्राहकांसाठी तो ५.२ टक्क्यांवर ५.९ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

टॅरिफमध्ये सुमारे २५ टक्क्यांची दरवाढ केल्यामुळे टेलिकॉम कंपन्यांसाठी एआरपीयूमध्ये १६ टक्के वाढ होणार असून भारती एअरटेलसाठी ती २९ रुपये आणि जिओसाठी २६ रुपये एवढी असेल. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने मार्चच्या तिमाहीसाठी १८१.७ रुपये एआरपीयू नोंदवला आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्या टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिवापरकर्ता सरासरी महसूल खूपच कमी आहे. याचा अर्थ प्रत्येक वापरकर्त्यावर मोबाईल कंपन्या जेवढा खर्च करतात, तेवढी त्या कमाई करत नाहीत. त्यामुळेच टेलिकॉम कंपन्या त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये सुमारे २५ टक्क्यांनी वाढ करू शकतात.

किती बसणार खिशाला चाट?

आता जर २५ टक्के दरवाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशाला किती झळ बसणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर दरमहिन्याला २०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तो ५० रुपयांनी महाग होईल. याचा अर्थ २०० रुपयांचा टॅरिफ प्लॅन २५० रुपयांना मिळेल.

तुम्ही जर ५०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तो २५ टक्क्यांच्या दरवाढीनंतर १२५ रुपयांनी महाग होईल. म्हणजे तुम्हाला ६२५ रुपये मोजावे लागतील. तुम्ही जर १ हजार रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तो २५० रुपयांनी महाग होईल म्हणजेच यासाठी तुम्हाला १ हजार २५० रुपये मोजावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!