लोकसभा निवडणुकीसाठी केसीआर- एमआयएम स्थापणार तिसरी आघाडी?


हैदराबादः भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बाहेर असलेले राजकीय पक्ष आणखी एक आघाडी स्थापन करणार का? असा प्रश्न देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांनी तसे संकेत दिले आहेत. एनडीए किंवा इंडिया आघाडीच्या बाहेर असलेले अनेक राजकीय पक्ष आहेत. अशा पक्षांना घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा संकल्प ओवैसी यांनी बोलून दाखवला आहे.

‘इंडिया’ आघाडीमध्ये सामील होण्यासाठी निमंत्रित न केल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी तिसऱ्या आघाडीचे घोडे पुढे दामटले आहे. मला निमंत्रित केले नसल्याची मला अजिबात पर्वा नाही. बसप प्रमुख मायावती, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि पूर्वोत्तर आणि महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष इंडिया आघाडीचे सदस्य नाहीत, असे ओवैसी म्हणाले.

आम्ही तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांना पुढाकार घेण्यास आणि तिसरी आघाडी स्थापन करण्यास सांगितले आहे. या तिसऱ्या आघाडीत एनडीए आणि इंडिया आघाडीत समाविष्ट नसलेल्या राजकीय पक्षांना सामावून घेण्यासही त्यांना सांगितले आहे. देशात एक राजकीय अवकाश आहे. तो केसीआर यांनी नेतृत्व केल्यास भरून निघू शकतो. इंडिया आघाडी हा अवकाश भरून काढण्यास सक्षम नाही, असेही ओवैसी म्हणाले.

विशेष म्हणजे ओवैसी यांनी तिसऱ्या आघाडीसाठी ज्या राजकीय पक्षाची नावे घेतली आहेत, त्यांच्यावर विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. या राजकीय पक्षांची भाजपशी मिलीभगत असल्यामुळे भाजप या राजकीय पक्षांच्या नेत्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप इंडिया आघाडीचे नेते करत आले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक दिवस आधीच असा आरोप केला आहे. हैदराबादमध्ये काँग्रेस कार्य समितीची बैठक संपल्यानंतर आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केसीआर यांच्या नेतृत्वातील बीआरएस सरकारवर सडकून टीका केली होती. केसीआर यांचा बीआरएस आणि ओवैसी यांचा एमआयएम हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची भूमिका बसप प्रमुख मायावती यांनी जाहीर केली होती. त्याबाबत इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया आली होती. मायावती अद्यापही भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत आणखी स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले होते.

बीआरएस आणि एमआयएमसह अन्य पक्षांच्या समावेशाने स्थापन होऊ पाहणारी तिसरी आघाडी इंडिया आघाडीला आव्हान देऊ शकेल का? असा प्रश्नही या निमित्ताने चर्चिला जाऊ लागला आहे.

ज्या राजकीय पक्षाना सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याची चर्चा केली जात आहे, त्या राजकीय पक्षांचा आवाका आणि पोहोच अतिशय मर्यादित आहे.

मायावती यांचा उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील जनाधार कमालीचा घटला आहे. तेलंगणमध्ये यावेळी केसीआर यांच्या बीआरएसची स्थिती बिकट आहे. ओवैसी यांचा जनाधारही अत्यंत मर्यादित आहे. या तिसऱ्या आघाडीत अन्य राजकीय पक्षही सामील झाले तरी त्यांचा म्हणावा तसा विशेष जनाधार नाही.

 दुसरीकडे इंडिया आघाडीत २६ राजकीय पक्ष सामील आहेत. या आघाडीतील राजकीय पक्ष विविध राज्यातील प्रमुख आणि राजकीय प्रभाव असलेले पक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव नाकारला जाऊ शकत नाही. मग ते बिहारमधील जेडीयू, आरजेडी असो की तामीळनाडूमधील डीएमके किंवा जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स किंवा पीडीपी, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, पंजाब व दिल्लीत आम आदमी पार्टी, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा किंवा महाराष्ट्रातील शिवसेना (उबाठा) आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस! याशिवाय देशात सर्वदूर प्रभाव आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क असलेली काँग्रेसही इंडिया आघाडीमध्ये आहे.

 विद्यमान परिस्थिती पाहता इंडिया आघाडी देशातील ६० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते, असे मानले जाते. त्या तुलनेत तिसरी आघाडी कुठेच बसत नाही. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमधील मोठ्या राजकीय पक्षांचा सहभाग आता नगण्य आहे. एनडीए जुने सहकारी सोडून निघून गेले आहेत.

अन्य राजकीय पक्षांना सामावून घेण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे. परंतु ज्यांचा समावेश करून घेण्याची चर्चा केली जात आहे, त्यांचा राजकीय जनाधार मर्यादित आहे. त्यामुळे कोणती आघाडी कोणता प्रभाव आणि परिणाम साधणार हे आगामी लोकसभा निवडणुकीतच पहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!