सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर: विखे; भाजपकडून शेवटपर्यंत पाठिंब्याचा अधिकृत निर्णय नाहीच!


अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा पाठिंबा नेमका कोणाला? या प्रश्नाचे अधिकृत उत्तर मतदान एक दिवसावर येऊन ठेपले तरी मिळालेले नाही. काँग्रेसमधून बंडखोरी करून नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे गृहित धरले जात होते. परंतु मतदान तोंडावर येऊन ठेपले तरी भाजपकडून पाठिंब्याचा अधिकृत निर्णय होऊ शकलेला नाही. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘कार्यकर्त्यांच्या पातळीवर सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय झाला आहे,’ असे जाहीर केले.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरूवातीपासूनच रंगतदार होत गेली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. उलट त्यांचे चिरंजीव  सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि विजयासाठी भाजपची मदत घेणार असल्याचेही जाहीर केले.

सत्यजित तांबे यांनी भाजपच्याच भरवश्यावर काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे भाजपकडून सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा जाहीर केला जाईल, असे मानण्यात येत होते. परंतु मतदानाची तारीख एक दिवसावर येऊन ठेपली तरी भाजपने सत्यजित तांबेंना उघडपणे अधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र वेगळ्या भाषेत जो द्यायचा तो संकेत दिला.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झाला आहे, असे विखे पाटील म्हणाले.

सत्यजित तांबे तरूण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सत्यजित तांबेंना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

शेवटपर्यंत अधिकृत निर्णय नाहीः नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबतचा भाजपचा अधिकृत निर्णय शेवटपर्यंत होऊ शकलेला नाही. तांबे हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्यामुळे याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात यावा, अशा सूचना वरिष्ठांकडून आल्यानंतर पाठिंब्याची अधिकृत घोषणा न करता कार्यकर्त्यांना अंतर्गत सूचना देण्यात आल्या आणि त्यांनी आज सकाळपासूनच सत्यजित तांबेंना मतदान करण्याचे आवाहन करणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवायला सुरूवात केली. त्यानंतर विखे पाटील यांनी ही माहिती दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!