औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवाः आ. शिरसाटांची मागणी, एवढाच द्वेष असेल तर मकबरा पहायला का गेले? एमआयएमचा सवाल


छत्रपती संभाजीनगरः औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर समर्थन-विरोधाचे राजकारण सुरू असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून हैदराबादला हलवा, अशी मागणी केली आहे. शिरसाट यांच्या मागणीमुळे राज्यात नवा राजकीय गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ एमआयएमने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आ. शिरसाट यांनी ही मागणी केली आहे. शिरसाट हे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार असल्यामुळे त्यांच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जर त्यांचे औरंगजेबावर इतकेच प्रेम असेल तर औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवा. त्यांना तेथे स्मारक बांधू द्या किंवा त्यांना हवे ते करू द्या. कोणीही त्रास देणार नाही, परंतु हे आंदोलन थांबवा, असे आ. शिरसाट यांनी म्हटले आहे.

समाजात असंतोष निर्माण करणे हाच शिरसाठांचा हेतू- एमआयएमः आ. शिरसाट यांनी केलेली मागणी केवळ राजकारण असून राजकारणात त्यांचे स्थान बळकट करण्यासाठीच त्यांनी ही मागणी केली आहे. समाजात असंतोष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे, असे एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी म्हटले आहे.

…मग मकबरा पहायला का गेले?: जर त्यांच्या मनात औरंगजेबांबद्दल इतका द्वेष असेल तर मग ते जी-२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींना औरंगजेबाची पत्नी राबिया-उल-दौरानी यांची १६६८ मध्ये बांधलेली समाधी पाहण्यासाठी का घेऊन गेले? औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने बांधलेला ‘बीबी का मकबरा’ पाहण्यासाठी का नेले? असे सवाल शारेक नक्षबंदी यांनी केले आहेत. भाजप आणि त्याच्या मित्रपक्षाकडे लोकांपर्यंत जाण्यासाठी कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत म्हणून अशा प्रकारचे राजकारण करून ते समाजात फूट पाडत आहेत, असा आरोपही नक्षबंदी यांनी केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!