आ. संजय शिरसाटांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत आहेत का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही?: खा. सुप्रिया सुळेंचा सवाल

मुंबईः ‘हे माझे भाऊ आहेत, ते माझे भाऊ आहेत, असे म्हणणाऱ्या त्या बाईने काय लफडी केलीत ते तिलाच माहिती,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे वादग्रस्त टीका करणारे शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे. शिरसाट हे सरकार पक्षाचे आमदार आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल करत त्यांच्यावर अद्याप गुन्हाही दाखल झालेला नाही, हे अतिशय खेदजनक आहे, असे खा. सुळे यांनी म्हटले आहे.

 छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना अर्वाच्च भाषा वापरली.  ‘हे माझे भाऊ आहेत, ते माझे भाऊ आहेत, असे म्हणणाऱ्या त्या बाईने काय लफडी केलीत ते तिलाच माहिती. आम्ही ३८ वर्षे शिवसेनेत घालवली. तू आहेस कोण?,’ असे संजय शिरसाट म्हणाले होते. शिरसाटांच्या या वादग्रस्त विधानानंतर सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेत तक्रार केली होती. आ. शिरसाटांच्या या विधानावर सर्वस्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी ट्विट करून सरकारला सुनावत आ. शिरसाट यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

‘छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय? हा प्रश्न अधिक दाहक बनतो’,  असे खा. सुळे यांनी म्हटले आहे.

‘बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे’, असे खा. सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी’, अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.

‘अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे’, अशी आठवणही खा. सुळे यांनी करून दिली आहे.

 चाकणकर म्हणाल्या, पोलिसांना दिलेली ४८ तासांची मुदत उद्या संपते, मग…

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही सुषमा अंधारे यांच्या तक्रारीबाबत माहिती दिली आहे. सुषमा अंधारे यांच्या तक्रारीवर ४८ तासांच्या आत कारवाई करून अहवाल सादर करा, अशा सूचना छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत, असे चाकणकर म्हणाल्या.

 सुषमा अंधारे यांची तक्रार राज्य महिला आयोगाला मिळाली. त्यानंतर आयोगाने संभाजीनगर पोलिस आयुक्तांना यासंबंधी चौकशी करून कारवाई करण्याची आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा अहवाल ४८ तासांत सादर करण्यास सांगितले होते. तो कालावधी उद्या संपेल. तेव्हा आपल्याला मजेल की पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली, असे चाकणकर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!