मी काँग्रेसचे तळवे चाटले म्हणता, तुम्ही मिंधे-नितीशकुमारांचे काय चाटले?: उद्धव ठाकरेंचा भाजप, अमित शाहांवर हल्लाबोल


छत्रपती संभाजीनगरः जगातील सर्वात शक्तिमान नेता देशाचा प्रधानमंत्री झाल्यानंतरही देशातील हिंदूंना आक्रोश करायला लागतो, तर त्या नेत्याची शक्ती काय कामाची? अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला. महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा हिंदू-मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश करण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेसाठी मी काँग्रेस- राष्ट्रवादीचे तळवे चाटले म्हणता, तर तुम्ही मिंधे- नितीशकुमारांचे काय चाटले? असा खोचक सवालही त्यांनी केला.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या सभेला अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

जातीय तेढ निर्माण झाली निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून समजा. हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मुंबईत कुठून काढला मला माहिती नाही. पण तो शिवसेना भवनापर्यंत आणला. मी म्हटले याचा अर्थ एकच आहे. जगातील सर्वात शक्तिमान हिंदू नेते देशाचा प्रधानमंत्री झाल्यानंतरही देशातील हिंदूंना आक्रोश करावा लागतो, तर त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश करण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती, असे ठाकरे म्हणाले.

तुमचे हिंदुत्व आम्हाला अमान्य

मी काँग्रेसबरोबर गेल्यावर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासोबत तुम्ही काश्मिरात मांडीला मांडी लावून बसलात तेव्हा तुम्ही काय सोडले होते?  तुम्ही म्हणाल तोच हिंदू आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही अशी तुमची वृत्ती असेल तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे. आम्ही तुमचे हिंदुत्व मानायला तयार नाही. देशात एक विधान, एक निशाण असे तुम्हाला राबवायचे आहे. दुसरा पक्षच तुम्हाला शिल्लक ठेवायचा नाही. देशाची वाटचाल अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे, असेही ठाकरे म्हणाले.

कशाला छत्रपतींचे नाव घेता? छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराची ओटी भरून तिला परत पाठवली होती. ते आमचे हिंदुत्व आहे. पण तुम्ही सगळ्यांना छळता. धाडी टाकता. इथला एक गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतो, हे तुमचे हिंदुत्व? तुमचा एक गद्दार सुषमा अंधारेंबद्दल खालच्या पातळीवर टीका करतो. हे तुमचे हिंदुत्व? आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही, हे पुन्हा सांगतो, असे ठाकरे म्हणाले.

… तेव्हा तुम्ही काय चाटत होता?

पुण्यात अमित शाह म्हणाले की मी सत्तेसाठी काँग्रेसचे तळवे चाटले. मला शिवसेनाप्रमुखांची भाषा येत नाही, असे नाही. परंतु काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणारी नाही. पण मी एवढेच विचारतो की, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर तुम्ही सत्तेसाठी मिंधे गटाचे काय चाटताय?  बिहारमध्ये लालूंचे सरकार पाडून नितीश कुमारांसोबत तुम्ही सत्ता स्थापन केली तेव्हा तुम्ही नितीशकुमारांचे काय चाटत होता? अमित शाहांनी संगमांवर देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा आरोप केला होता. त्याच संगमांचे आता तुम्ही काय चाटताय?  मोदी म्हणतात की त्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम चालू आहे. हे काम कोण करतेय?   आम्ही करतोय का?  आमची प्रतिमा नाही का? तुमचा कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणणार. आम्ही गप्प बसायचे आणि आम्ही काहीही बोलले तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना काहीही म्हटले तर मोदींचा अपमान. मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान, असेही ठाकरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित वज्रमूठ सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली.

हिम्मत असेल तर मोदींना घेऊन महाराष्ट्रात या

आज मी मुख्यमंत्री नाही. आपल्या पक्षाचे नाव, चिन्ह त्यांनी चोरले. एवढेच नाही तर माझे वडिलही चोरायचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वडिलांना किती वेदना होत असतील? काय दिवटं कार्ट आहे याला बापसुद्धा दुसऱ्याचा लागतो. मी माझ्या वडिलांचे नाव सोडणार नाही. भाजपमध्ये हिंमत असेल तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या. मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो. होऊनच जाऊ द्या. तुम्ही माझे काय चोरणार आहात? माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. ते तर तुम्ही चोरू शकत नाही ना?, असे ठाकरे म्हणाले.

… त्या दिवशी लोकशाहीला श्रद्धांजली वहावी लागेल

भाजप न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहे. न्यायवृंदामध्ये आपली माणसे घुसवू इच्छित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचे ऐकलेच पाहिजे असे यांचे म्हणणे आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!