हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा


मुंबईः मराठा आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक आहोत. परंतु काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हिंसाचार घडवणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. जमावाने माजलगाव आणि बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची घरे जाळली. बीडमधील राष्ट्रवादी भवनाची तोडफोड करण्यात आली. माजलगावमध्ये नगर परिषद आणि पंचायत समिती कार्यालयही पेटवून देण्यात आले. या सर्व प्रकारावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भूमिका मांडली.

ज्या प्रकारे बीडमध्ये सोमवारी लोकप्रतिनिधींची घरे जाळणे, विशिष्ट लोकांना टार्गेट करणे, प्रतिष्ठाने जाळणे, दवाखाने जाळणे ही कृती काही लोकांनी केली आहे, अशा प्रकारची जी कृती केली आहे, ती चुकीची आहे. त्यावर कारवाई होणार आहे. जेथे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे, तेथे कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

हिंसाचाराला कुठेही थारा नाही. आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत पोलिस कारवाई करतील. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालले आहे, त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्म पावले उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे वचन दिले आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र याचवेळी काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

काही राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते या हिंसाचारात सहभागी असल्याचे दिसत आहे. त्यासंदर्भात सगळे पुरावे मिळाल्यानंतर त्याचीही माहिती आपल्याला दिली जाईल. काही लोक जाणीवपूर्वक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर आम्ही कारवाई करणार आहोत. काही लोक फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!