नवी मुंबईत १५ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी, कोपरा ब्रीजजवळील वाहतुकीतही बदल


ठाणे: नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ एप्रिल ते १६ एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील खारघर येथील कोपरा ब्रीजजवळील वाहतुकीतही बदल करण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळवले आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित रहावी यासाठी १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपासून ते १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड-अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळवले आहे.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

१५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. २ वाजेपासून ते १६ एप्रिल २०२३ च्या रात्री ११ वाजेपर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमूद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडून ठाणे बेलापूर रोडने तसेच शिळफाट्याकडून महापे व तळोजा कडून जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली टोल नाकामार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाकामार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

४. पुणे-मुंबई महामार्ग व पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडूग टोल नाकामार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडून गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईंट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड-अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

ही वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही अत्यावश्यक सेवेतील जड-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे काकडे यांनी कळवले आहे.

खारघर येथील कोपरा ब्रीजजवळील वाहतुकीतही बदल

१५ एप्रिल रोजी २ वाजेपासून १७ एप्रिलच्या सकाळी १० वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रीजखालील अंडर पासमधून स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रीज सिग्नलवरुन यूटर्न घेऊन कोपरा ब्रीजजवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.३५ कडील नियोजित वाहनतळाकडे जातील.

प्रवेश बंद: १५ एप्रिल रोजी २ वाजेपासून ते १७ एप्रिलच्या सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील कोपरा अंडरपास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

पर्यायी मार्ग: पुणे- मुंबईकडून स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रीज चढून हिरानंदानी ब्रीज खालील सिग्नल येथून यू टर्न घेऊन परत कोपरा ब्रीजकडे जावून कोपरा ब्रीजजवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावून पुढे इच्छित स्थळी जातील.

वाहतुकीतील हा बदल अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे काकडे यांनी कळवले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!