लोह्याच्या डॉ. नानासाहेब सूर्यवंशींनी डॉ. श्रीराम गुंदेकरांच्या मूळ साहित्यकृतीतून केले चौर्यकर्म, पटकावला प्रतिष्ठेचा रोहमारे पुरस्कार!

औरंगाबादः कोपरगाव येथील रोहमारे ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील संत गाडगेबाबा महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांना त्यांच्या ‘ग्रामीण साहित्य मूल्य आणि अभिरूची’ या ग्रंथासाठी जाहीर झाला आहे. परंतु डॉ. सूर्यवंशी यांचा हा ग्रंथ त्यांची मूळ साहित्यकृती नसून सत्यशोधकी साहित्याचे इतिहासकार डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या ‘ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन’ या मूळ साहित्यकृतीची उचलेगिरी असल्याचा आक्षेप आहे. एका ज्येष्ठ सत्यशोधकी साहित्यिकाच्या मूळ साहित्यकृतीत थोडाफार फेरफार आणि शब्दांची फिरवाफिरव करून डॉ. सूर्यवंशी यांनी त्यांचा ग्रंथ प्रसवला आणि त्याच ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सत्यशोधकाच्या तिजोरीवर भुरट्या चोराने दरोडा टाकून प्रतिष्ठेचा भि.ग. रोहमारे पुरस्कार पटकावला, अशी टीका सत्यशोधक शिक्षक सभेने केली आहे.

 सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे महत्त्वाचे समर्थक, लेखक आणि सत्यशोधकी साहित्याचे इतिहासकार दिवंगत डॉ. श्रीराम गुंदेकर यांचा ग्रामीण साहित्याची मीमांसा करणारा ‘ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन’ हा ग्रंथ १५ ऑगस्ट १९९९  रोजी पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केला. डॉ. गुंदेकर हे मराठीतील  ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक, भाष्यकार. बीड जवळील आंबेसावळी येथे एका शेतकरी कुटुंबात  त्यांचा जन्म झाला होता. महात्मा फुले यांच्या विचारांच्या साहित्यप्रभावातून त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व घडत गेले.

साधारणपणे याच विषयावर ग्रंथाच्या शीर्षकाची उलटपालट करून ‘अक्षर वाङ्मय’ या त्रैमासिकाचे संपादक, आणि दिवंगत स्वातंत्र्य सेनानी, शेकापचे झुंजार नेते भाई केशवराव धोंडगे यांनी स्थापन केलेल्या कंधारच्या छत्रपती शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या लोहा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.नानासाहेब सूर्यवंशी यांचा ‘ग्रामीण साहित्य मूल्य आणि अभिरुची’ हा ग्रंथ पुण्याच्याच पद्मगंधा प्रकाशनाने नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रकाशित केला. डॉ. सूर्यवंशी यांच्या या ग्रंथाला प्रतिष्ठेचा भि. ग. रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आणि नव्या वादाला तोंड फुटले आहे. डॉ. सूर्यवंशी यांचा हा ग्रंथ डॉ. श्रीराम गुंदेकरांच्या मूळ साहित्यकृतीची उचलेगिरी असल्याचा आक्षेप सत्यशोधक शिक्षक सभेने घेतल्यामुळे साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सत्यशोधक शिक्षक सभेचे राज्याध्यक्ष डॉ. श्याम मुडे यांनी याबाबत एक सविस्तर निवेदनच प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी डॉ. सूर्यवंशी यांच्या ग्रंथावर गंभीर आक्षेप नोंदवले असून निवेदनासोबत पुरावेही दिले आहेत. त्यांच्या मते, डॉ. सूर्यवंशी यांच्या ग्रंथातील ‘ग्रामीण साहित्य: संकल्पना, स्वरूप आणि प्रेरणा’ हे प्रकरण डॉ. गुंदेकरांच्या पूर्वनिर्देशित ग्रंथातील ‘ग्रामीण साहित्याची प्रेरणा’ या प्रकरणाशी एक समान आणि मिळते जुळते आहे, असा त्यांचा आक्षेप आहे.

चौर्यकर्माचे हे तपासा पुरावे, पुरावा क्रमांकः १

डॉ. श्रीराम गुंदेकरांच्या मूळ साहित्यकृतीतील उतारा

डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांच्या ग्रंथात उतरलेले चौर्यकर्म असेः

मराठी भाषेच्या अभ्यासकांनी, साहित्याची जिज्ञासा असलेल्या रसिक वाचकांनी आणि मराठी साहित्य संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यमान आणि भावी संशोधकांनी आपल्या नजरेखालून  हे प्रकरण निदान एकदा तरी ओझरते घालावे. म्हणजे मराठी साहित्याच्या क्षेत्रात संशोधन आणि समीक्षेच्या नावाखाली कसा चोर बाजार भरला आहे, याची झलक आपल्याला पाहायला मिळते, असे डॉ. मुडे यांनी म्हटले आहे.

अभ्यासू वाचकांनी या दोन्ही ग्रंथातील ही दोन्ही प्रकरणे शब्द न् शब्द, ओळी न्  ओळ, वाक्य न् वाक्य आणि परिच्छेदानुसार समोरासमोर ठेवून बारकाईने पाहावेत, एकेक शब्द मोजून वाचावेत म्हणजे या दरोड्याचे गांभीर्य लक्षात येईल, असेही डॉ. मुडे यांनी म्हटले आहे.

चौर्यकर्माचे हे तपासा पुरावे, पुरावा क्रमांकः २

डॉ. श्रीराम गुंदेकरांच्या मूळ साहित्यकृतीतील उतारा

डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांच्या ग्रंथात उतरलेले चौर्यकर्म असेः

आजच्या वाङमय व्यवहारात, सद्य:स्थितीत या वाङमयीन दरोडेखोरींचा काय आणि कसा अन्वयार्थ लावावा? आपण साहित्य संशोधनाच्या नावाखाली, समीक्षेच्या नावाखाली साहित्य क्षेत्रात किती बाजारू आणि धंदेवाईक होऊन धुमाकूळ घालत आहोत? हे पाहून कोणाही संवेदनशील रसिक वाचकांचे मन विष:न्न झाल्याशिवाय राहत नाही. साहित्य क्षेत्रातील हा अनिर्बंध धंदेवाईक बाजार आपल्या मराठी साहित्य विश्वाला कोणत्या गटारात नेऊन टाकेल याबद्दल कल्पनाच करवत नाही,  असे डॉ. मुडे यांनी म्हटले आहे.

ही परिस्थिती मराठी साहित्याचे डांगोरा पिटून वारंवार सांगितले जाणारे वैभव(?) खरेच आहे, की नुसता बोभाटा आहे ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मागण्यासाठी सरकार दरबारी खेटे घालणे चालू असताना त्याच मराठीची, तिची दिवटी पिलावळ काय हालत करत आहे, हे भीषण वास्तव अनुभवायला मिळते, असे डॉ. मुडे यांनी म्हटले आहे.

चौर्यकर्माचे हे तपासा पुरावे, पुरावा क्रमांकः

डॉ. श्रीराम गुंदेकरांच्या मूळ साहित्यकृतीतील उतारा

डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांच्या ग्रंथात उतरलेले चौर्यकर्म असेः

आपला अभिजात म्हणवला जाणारा साहित्य/ समीक्षा व्यवहार कोणत्या भीषण वळणावर या तथाकथित महान संपादक/ समीक्षकांनी आणून ठेवला आहे? इतकेच नव्हे तर लेखन, संशोधनाच्या नावाने आपण आपल्याच राजभाषा/मातृभाषा, पोटापाण्याचे साधन केलेल्या मराठी भाषेला कसे भिकेला लावत आहोत, तिची आधीच फाटकी तुटकी असलेली लक्तरे वेशीवर टांगत आहोत! तरीही आपला कोडगेपणा इतका की तिच्या नावे झोळी पसरून बिनदिक्तपणे पुरस्कारांची/ पारितोषिकांची भिक मागत आहोत. हे सगळे पाहिल्यावर चक्रधर- नामदेव- तुकाराम -फुले- आंबेडकर -साने गुरुजींच्या मराठी राजभाषेला किती दयनीय अवस्था आली आहे, याची कल्पना येते,  असा संतापही डॉ. मुडे यांनी या निवेदनात व्यक्त केला आहे.

खिरापती सारखे पुरस्कार वाटणाऱ्या संस्था, मंडळे, परिषदा आणि त्यांचे तज्ञ(?) परीक्षक या सर्वांच्याच एकूण वाङमयीन अकलेविषयी शंका यावी, कीव यावी, लाजही वाटावी अशी गचाळ स्थिती आज झालेली आहे, असेही डॉ. मुडे यांचे म्हणणे आहे.

मराठी साहित्य मंडळ आरोपीच्या पिंजऱ्यात

मराठी साहित्य महामंडळासारखी, एकूण मराठी साहित्य व्यवहारासाठी जबाबदार असलेली केंद्रीय साहित्य संस्था दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कशासाठी घेते? त्यांच्या धुरीणांना ही अशी दरोडेखोर मंडळी दिसत नाहीत का? शिक्षण क्षेत्रातील अशा प्रकारच्या दरोडेखोर मंडळींच्या हातात मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संशोधन आणि असंख्य विद्यार्थी यांचे भवितव्य किती असुरक्षित आहे याची कल्पनाच करवत नाही! आणि हीच मंडळी जर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळातील शैक्षणिक प्राधिकरणावर असतील तरी एकूणच त्या विद्यापीठाचे शिक्षण व संशोधनावर जटिल प्रश्न आहे, अशा मंडळींनी भाषा आणि वाङमयाच्या विकासासाठी चालवलेली नियतकालिके आणि त्यातून काही नवे विचार, नवे सर्जन होण्याची सुतराम शक्यता नाही, असे डॉ. मुडे उद्विग्नतेने म्हणतात.

पुरस्कार परत घ्या

 या पुस्तकाला पुरस्कार देणाऱ्या कोपरगाव येथील कोपरगाव एज्युकेशन सोसायटीने, त्यांच्या पुरस्कार समितीने डॉ. सूर्यवंशी यांना दिलेला भि.ग. रोहमारे पुरस्कार तात्काळ परत घ्यावा, असे आम्ही नम्र आवाहन करतो. नाहीतर अगदी नाईलाजानेच या चौर्य कर्माच्या विरोधात महाराष्ट्रातील सत्यशोधकांना प्रखर आवाज उठवावा लागेल, असा इशाराही डॉ. मुडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!