बारावीच्या प्रश्नपत्रिकेची प्रत्येकी १० हजारांत विक्री, अहमदनगरमध्ये मुख्याध्यापकासह पाच जणांना ठोकल्या बेड्या!


मुंबई/अहमदनगरः मोठा गाजावाजा करून राज्य सरकारने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी राबवलेल्या अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे. इयत्ता बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी अहमदनगरमधून एका मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअपद्वारे ती पाठवून प्रत्येकी १० हजार रुपयांत विक्री करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबईच्या दादर येथील अँटोनिओ डिसिल्वा हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षिकेच्या तक्रारीवरून या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात दादरमधील विद्यार्थ्याला मिळालेली प्रश्नपत्रिका अहमदनगरमधून मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अहमदनगर येथील मातोश्री भागुबाई भांबरे कृषी व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब लोभाजी अमृते (वय ५४), महाविद्यालयातील शिक्षक किरण संदीप दिघे (वय २८), सचिन दत्तात्रय माहानवर (वय २३) गाडीचा चालक वैभव संजय तरटे आणि महाविद्यालयाच्या मालकाची मुलगी अर्चना बाळासाहेब भांबरे (वय २३) यांना अटक केली आहे.

 हे आरोपी ३ मार्च रोजी म्हणजे गणिताच्या पेपरच्या दिवशी बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले आणि प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर त्यांना २० किलोमीटर दूर परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतरच प्रश्नपत्रिका उघडायची होती. परंतु परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या आधीच या आरोपींनी प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा उघडला आणि आरोपी महिला शिक्षिका किरण दिघे हिने सकाळी ९.३० वाजताच आपल्या मोबाईलवरून गणिताची प्रश्नपत्रिका लिक केली. आपल्या १७ वर्षांच्या बहिणीच्या मोबाईल या प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवला. ज्या विद्यार्थ्यांकडून किरण दिघेने गणिताची प्रश्नपत्रिका देण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये घेतले होते, त्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका पाठवण्यास सांगितली. हीच प्रश्नपत्रिका दादर येथील परीक्षा केंद्रावर पकडलेल्या विद्यार्थ्याला पाठवण्यात आली होती. या आरोपींनी अन्य विषयाच्याही प्रश्नपत्रिका याच पद्धतीने फोडल्याचा संशय असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

 गुन्हे शाखेच्या तपासात प्रश्नपत्रिका विक्रीचा हा गोरखधंदा उजेडात आल्यामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून राज्य सरकारने कॉपीमुक्ती अभियान हाती घेतले होते. त्यासाठी प्रचार-प्रसार आणि कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र  या परीक्षेदरम्यान उघडकीस येत असलेल्या गैरप्रकारांच्या घटना पाहता या अभियानाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!