छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जागतिक वारसास्थळे लाभलेली पर्यटन नगरी अशी ओळख असलेले आणि ‘स्मार्ट सिटी’ची बिरुदावली मिरवणारे छत्रपती संभाजीनगर शहर रात्रीच्या अंधारात तर सोडाच पण दिवसाच्या उजेडातही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. एकटी दुकटी चाललेली महिला पाहून बिभत्स शेरेबाजी, अंगविक्षेप, छेडछाड, पाठलाग असे प्रकार या शहरात सर्रास सुरू आहेत. शहरातील महिला एकीकडे उनाडांचा हा त्रास सहन करत असतानाच महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा नसल्यामुळे त्यांना कुचंबनेला सामोरे जावे लागत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने जयपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही दोन शहरे अत्यंत संवेदनशील असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शहरातील महिला सुरक्षेचे ऑडिट करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महिला आयोगाने गांधीनगरच्या गुजरात राष्ट्रीय विधी विद्यापीठाकडे सोपवली.
या विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली जन शिक्षण संस्थानच्या विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरातील महिला सुरक्षेबाबत सर्वेक्षण केले. त्यातून हे धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जन शिक्षण संस्थानचे संचालक प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी आज या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली.
शहरातील ज्युब्ली पार्क, एन-७ सिडको, रोज गार्डन, सलीम अली सरोवर, अदालत रोड, प्रियदर्शनी गार्डन, हर्सूल टी पॉइंट या ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या महिलांना छेडछाड, अश्लील शेरेबाजीला सामोरे जावे लागते. एकट्या जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करणे आणि टोमणे मारत तिची छेड काढण्याचेही प्रकारही या शहरात घडत आहेत. दिवसाढवळ्या महिलांना हा त्रास सहन करावा लागतो. रात्री आठ वाजल्यानंतर या ठिकाणांसह शहरातील बहुतांश भागात महिलांना असुरक्षित वाटते, असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.
शहरात ज्या ठिकाणी दारूची दुकाने, परमीट रूम आहेत, त्या ठिकाणी नियमाप्रमाणे पोलिस तैनात असणे आवश्यक आहे. परंतु शहरातील अशा कोणत्याही ठिकाणी पोलिस तैनात नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या बाबतीत महिलांचा अनुभवही फारसा चांगला नाही. अडचणीत सापडलेल्या महिलेने पोलिसांकडे मदत मागितली तर त्यांना फारसे सहकार्यच मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून समोर आले आहे.
शहरात महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. जिथे आहेत, तिथे कमालीची अस्वच्छता आहे. त्यामुळे ती वापरण्यायोग्य नाहीत. काही ठिकाणची स्वच्छतागृहे कुलूप बंद आहेत, असेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. बाबा, सिडको बसस्टॅण्ड या ठिकाणी महिलांना रीक्षाचालकांची अरेरावी सहन करावी लागत असल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
या सर्वेक्षणात शहरातील सार्वजनिक ठिकाणे ज्यात उद्याने, बाजारपेठा, सिग्नल, शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन बस स्टॅण्ड, खासगी- कार्पोरेट कार्यालये इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष वावरणाऱ्या महिलांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात शहरातील १ हजार ३५२ महिला सहभागी झाल्या होत्या.
जन शिक्षण संस्थानचे विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाकडून सर्वेक्षणात प्राप्त झालेल्या तथ्यांचे विश्लेषण करून गुजरात राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्याचा अहवाल नवी दिल्लीच्या राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करणार आहे. यावेळी प्रा. मंगल खिवंसरा, डॉ. लक्ष्मी पिसारे, ईश्वरी कुलकर्णी उपस्थित होते.
आजपासून सेफ्टी वॉक
या उपक्रमांतर्गत पुढच्या टप्प्यात शासकीय कार्यालये, महानगरपालिका आणि पोलीस ठाण्यासह इतर कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या आणि कामानिमित्त कार्यालयात जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. यात परिचारिका समूह, अंगणवाडी सेविकांचा समूह, घरकाम करणाऱ्या महिलांचा समूह, महिला सफाई कर्मचाऱ्यांचा समूह, महिला बचत गृह समूह इत्यादी समूहातील महिलांशी संवाद साधला जाणार आहे.
याशिवाय १५ ते १८ ऑक्टोबर या काळात शहरात सेफ्टी वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी ते कर्णपुरा देवी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते मकाई गेट, विभागीय क्रीडा संकुल ते जवाहरनगर पोलीस ठाणे आणि रेणुका माता मंदिर ते टी. व्ही. सेंटर जळगांव रोड या ठिकाणी हा सेफ्टी वॉक होईल.