अमरावतीमध्येही महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी, भाजपला मोठा धक्का

अमरावतीः विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा गमावल्यानंतर अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव केला आहे. एकूणच या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व राखल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली आहेत. तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना  ४२ हजार ९६२ मते मिळाली आहेत. या अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत मतमोजणीच्या विविध टप्प्यात तब्बल २१ उमेदवार बाद झाले आहेत.

या मतदारसंघात विजयासाठी ४७ हजार १०१ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र हा कोटा एकाही उमेदवाराला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सर्वाधिक मते मिळालेले महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. धीरज लिंगाडे हे ३ हजार ३८२ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.

अमरावती मतदारसंघातील मतमोजणी २४ तासांपेक्षाही जास्त काळ चालली. उमेदवारांची जास्त संख्या, मतमोजणीची संथ गती, पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअखेर अवैध ठरलेल्या मतपत्रिकांचे फेरअवलोकन करण्याची भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी, या पडताळणीत गेलेला वेळ यामुळे अंतिम निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरली.

अमरावती पदवीधर मतदारसंघात तब्बल २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात एकूण २ लाख ६ हजार १७२ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४९.७५ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. वैध-अवैध मतांच्या पडताळणीअखेर ९४ हजार २२० मते वैध ठरली तर तब्बल ८ हजार ३८७ मते अवैध ठरवण्यात आली.

मतदारांनी भाजपला नाकारले, नापास केलेः विधान परिषदेच्या पाचपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. तो पण उमेदवार उधार-उसनवारीचा आहे. कोकणची जागा शेकापकडे होती. ती शिवसेनेने लढली असती तर कदाचित वेगळा निकाल लागला असता. मात्र, महाराष्ट्रातील उच्च, मध्यमवर्गीय सुशिक्षित आणि पदवीधर मतदारांनी भाजपचा पराभव केला आहे. भाजपला नाकारले असून नापास केले आहे. त्यामुळे उगाच खुलासे करू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!