विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची २९ व ३० ऑक्टोबरला महावितरणच्या परिमंडल कार्यालयांत पडताळणी


मुंबई:  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रसिद्ध केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहायक संवर्गातील उमेदवार आणि प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. कागदपत्रांची ही पडताळणी परिमंडल निहाय होणार आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी तीन वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांत २९ व ३० ऑक्टोबर रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जे उमेदवार कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल, असे महावितरणच्या वतीने कळवण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!