मुंबईः कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून तुरूंगात असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करत जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) मागणी पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे १०२ दिवसांनंतर राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईतील कथित पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हापासून म्हणजेच १०२ दिवस संजय राऊत हे आर्थर रोड तुरूंगात होते. या प्रकरणी पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू होती. ईडीचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असा दावा करत संजय राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. संजय राऊत हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ईडीचा ठपका आहे.
ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर राऊत यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला. संजय राऊत हे पत्राचाळ पुनर्विकासात सक्रीय सहभागी होते. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याचे मुख्यसूत्रधार आहेत, त्यांना त्यांचे नातेवाईक प्रवीण राऊत यांच्या आडून हा घोटाळा केल्याचा आरोप करत ईडीने संजय राऊतांच्या जामिनाला विरोध केला. तर राजकीय आकसापोटी आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले आणि कारवाई करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी जामिनाची मागणी करताना केला.
विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर केल्यानंतर या जामिनाविरोधात दाद मागण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी ईडीने केली होती. तपास यंत्रणांना उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठराविक वेळ द्यावा असे नाही, परंतु आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जामीन आदेशाला स्थगिती द्यावी, असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला होता. मात्र ईडीची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे जवळपास शंभर दिवसांनंतर संजय राऊत यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जामिनाच्या विरोधात ईडी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.