बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

नवी दिल्लीः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये सुरू झालेला अंतर्गत कलह वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिक पदवीधरमधून विजयी झालेले काँग्रेसचे बंडखोर आमदार सत्यजीत तांबे यांचे सख्खे मामा बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची खात्रीशीर माहिती आहे. आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी थोरातांचा राजीनामा स्वीकारणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना काँग्रेसकडून एबी फॉर्मही देण्यात आला होता. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेर्यंतही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या वळणार येऊन पोहोचली.

सत्यजित तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सख्खे भाचे आहेत. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीवरून एवढे सारे रामायण घडत असताना त्याची कल्पना बाळासाहेब थोरातांना नव्हती का? अशी चर्चा होत असतानाच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी थोरातांकडे चौकशी करण्याचा निर्णयही घेतला होता. परंतु त्यावेळी थोरात हे आजारी असल्यामुळे रूग्णालयात होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करतच विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर केल्याचे सांगण्यात येते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्यामुळे काँग्रेससाठी पोषक वातावरणही तयार झाले आहे. अशा स्थितीत डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षादेश धुडकावणे आणि सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करणे या दोन्ही गोष्टी काँग्रेसच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या ठरल्या आहेत.

 हे सगळे घडून गेल्यानंतर आता बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांचा राजीनामा स्वीकारणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 …पण पटोले म्हणतात असं काहीही झालेलं नाहीः याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो, अशा मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा. तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असे पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!