औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावरच बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रवेशद्वाराला आंबेडकरी जनतेने तीव्र विरोध केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तीन दिवसांत नवीन गेटचे बांधकाम पाडून टाकण्याचे दिलेले आश्वासन शुद्ध लोणकढी थाप ठरले आहे. कुलगुरूंनी आश्वासन देऊन तब्बल १८ दिवस उलटले तरी या नवीन गेटसाठी बांधण्यात आलेले दोन बीम अद्यापही तसेच उभे असून कुलगुरू डॉ. येवले यांनी दिशाभूल आणि फसवणूक केल्याची भावना आंबेडकरी जनतेतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अंतर्गत विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या सुशोभीकरणाच्या नावाखाली नामांतर चळवळीचे प्रतिक तसेच आंबेडकरी जनतेची अस्मिता आणि प्रेरणास्रोत असलेल्या मुख्य गेटपासून अवघ्या दहा-पंधरा फुटांच्या अंतरावर नवीन गेट बांधण्यात येत आहे.
मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व कमी करण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाकडून नवीन प्रवेशद्वार बांधण्यात येत असल्याचा आरोप करत आंबेडकरी जनतेने या नवीन गेटच्या उभारणीस कडाडून विरोध केला होता. त्यासाठी आंबेडकरी जनतेच्या शिष्टमंडळाने वारंवार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन सनदशीर मार्गाने आपला विरोध दर्शवला.
तरीही विद्यापीठ प्रशासन नवीन गेटचे बांधकाम पुढे रेटत असल्याचे पाहून ७ डिसेंबर रोजी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर धडक मारून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना चांगलेच धारेवर धरले होते. मुख्य गेटच्या सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु तुमच्या या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेत कोणती भर पडणार आहे? असा खोचक सवालही या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. येवले यांना केला होता. तुम्ही जर नवीन गेटचे झालेले बांधकाम पाडणार नसाल तर आम्ही बुलडोजर लावून ते पाडून टाकू, असा इशाराही या शिष्टमंडळाने दिला होता.
आंबेडकरी चळवळीच्या आक्रमक भूमिकेपुढे नमते घेत कुलगुरू डॉ. येवले यांनी तीन दिवसांत नवीन गेटचे बांधकाम पाडून टाकण्याचे आश्वासन दिले होते. विद्यापीठ प्रशासनाने नवीन गेटचे संपूर्ण बांधकाम पाडून टाकण्याबाबतचे लेखी पत्रही कंत्राटदाराला दिले होते. त्यानुसार ११ डिसेंबर रोजी नवीन गेटचे बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र नवीन गेटसाठी उभारण्यात आलेल्या तीनपैकी फक्त मध्यभागी उभारलेला एक बीम पाडून हे काम थांबवण्यात आले. उर्वरित दोन बीम अद्यापही तसेच उभे आहेत.
नवीन गेट पाडण्याचे काम थांबवल्याचे पाहून काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे त्याबाबत वारंवार विचारणा केली. पाठपुरावा केला तरीही विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना उडवाउडवी उत्तरे देण्यात आली. आज पाडू, उद्या पाडू असे सांगत काही अधिकाऱ्यांनी एकट्यात बसून ‘बोलण्याची’ भाषाही केली. परंतु आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते त्याला बधले नाहीत.
१४ जानेवारीला विद्यापीठाचा नामविस्तार दिन असून त्यापूर्वी हे बीम पाडून तेथे साफसफाई झाली नाही तर विद्यापीठ प्रशासनाला आंबेडकरी जनतेच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या नवीन गेटच्या बांधकामाला विरोध करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.
१४ जानेवारीला झळकणार ‘त्या’ दलालांचे डिजिटल बॅनरः आंबेडकरी चळवळीने एकजुटीने नवीन गेटच्या बांधकामाला विरोध केलेला असतानाच आंबेडकरी समुदायातीलच काही दलाल विद्यापीठ प्रशासनाची पाठराखण करत या नवीन गेटच्या बांधकामाला पाठिंबा देत असल्याचे आता उघड झाले आहे. त्यात विद्यापीठाच्या सेवेत असलेल्यांबरोबरच विद्यापीठ परिसरात दररोज जाऊन ‘दुकानदारी’ करणाऱ्या ‘दलालां’चाही समावेश आहे. येत्या १४ जानेवारी रोजी विद्यापीठाचा नामविस्तार दिन असून अस्मितेच्या प्रश्नावरही दलाली करणाऱ्यांचे चेहरे आंबेडकरी समुदायासमोर उघडे पाडण्यासाठी नामविस्तार दिनी या दलालांचे डिजिटल बॅनर विद्यापीठ गेटवर झळकवणार असल्याचे आंबेडकरी चळवळीतील एका कार्यकर्त्याने सांगितले.