छत्रपती संभाजीनगरः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘सेल्फि विथ लाभार्थी’ ही मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला भाजप महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात प्रारंभ करण्यात आला. मात्र या शुभारंभाच्याच कार्यक्रमात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची बोलणी आणि दरडावणीला महिला कार्यकर्त्या आणि लाभार्थ्यांना सामोरे जावे लागले. सेल्फी विथ लाभार्थी कार्यक्रमाच्या आधीच महिला कार्यकर्त्या आणि लाभार्थ्यांना ‘शाऊटिंग ऑन लाभार्थी’चा ट्रेलर पहायला मिळाला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सेल्फी काढण्याची संधी या मोहिमेअंतर्गत देण्यात येणार होती. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सभागृहात आल्या. सभागृहात येताच त्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि लाभार्थ्यांवर चांगल्याच भडकलेल्या दिसल्या.
स्मृती इराणी या व्यासपीठावर आल्यानंतर वर कोणीही यायचे नाही, नाव पुकारल्याशिवाय स्टेजवर यायचे नाही, असे त्यांनी महिला कार्यकर्त्या आणि लाभार्थ्यांना दरडावून सांगितले. तुम्ही खुर्चीवर बसलेल्या दिसलात तर मी वरून उठवेन तुम्हाला, असेही त्या म्हणाल्या. भाजपच्या या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आणि त्यांच्यासोबत लाभार्थी आले होते.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसोबतचा ‘सेल्फी विथ लाभार्थी’ हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच चित्रा वाघ यांनी ‘शाऊटिंग ऑन लाभार्थी अँड कार्यकर्ती’चा ट्रेलर दाखवल्यामुळे या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून आलेल्या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आणि लाभार्थ्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.
मला कोणीही खुर्चीवर बसलेले दिसता कामा नये. ऐकलं? क्लिअर? नाहीतर बाई उभी आहे आणि तुम्ही बसलेल्याच आहात. तर मी वरून उठवेन तुम्हाला, असे चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना सुनावले त्याचबरोबर नाव पुकारल्याशिवाय कुणीही यायचं नाही स्टेजवर, असे म्हणत त्यांनी लाभार्थ्यांनाही दरडावले. चित्रा वाघ यांच्या या दरडावणीमुळे महिला कार्यकर्त्या नाराज झाल्याचे दिसून आले.