‘अतिवेतन फसवेगिरी’ भोवलीः डॉ. गणेश मंझांना परीक्षा मंडळाच्या संचालकपदावरून हटवले, डॉ. भारती गवळी यांच्याकडे धुरा


छत्रपती संभाजीनगरः शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गात मूळ नियुक्ती असून फसवेगिरीकरून शिक्षक संवर्गाची वेतनश्रेणी लाटून शासकीय तिजोरीवर डल्ला मारणारे डॉ. गणेश मंझा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदावरून हटवण्यात आले आहे. आता संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. भारती गवळी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी फसवेगिरी करून शासकीय तिजोरीची लूट केल्याचा मोठा घोटाळा समोर आला आहे. विद्यापीठाच्या सेवेत उपकुलसचिव या शिक्षकेत्तर पदावर नियुक्ती झालेले डॉ. गणेश मंझा यांनी ‘फसवेगिरी’ करून शिक्षक संवर्गाची वेतन श्रेणी लागू करून घेत शासकीय तिजोरीची लूट केली आणि नियमानुसार दरमहा ३९ हजार ५८० रुपये वेतन देय असताना तब्बल २ लाख ४८ हजार ६७३ रुपये वेतन उचलत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्यांची सुधारित वेतनश्रेणी निश्चित केली असून डॉ. गणेश मंझा यांनी आजवर उचललेले लायकीपेक्षा जास्तीचे अतिरिक्त वेतन तातडीने शासन खाती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सहसंचालकांचा या आदेशानंतर डॉ. मंझा यांना नियमानुसार वेतन देण्याची कार्यवाही विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. ही कारवाई करत असतानाच डॉ. मंझा यांना परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदावरून हटवण्यात आले आहे.

डॉ. मंझा यांच्याकडील पदभार संगणशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. भारती वामनराव गवळी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मंझा यांना त्यांच्या मूळ पदावर म्हणजेच उपकुलसचिवपदावर पाठवण्यात आले आहे. २६ सप्टेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या डॉ. भारती गवळी यांचे उच्च शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनच झाले आहे. डाटा कॉम्प्रेशनमध्ये त्यांनी पीएच.डी.ही याच विद्यापीठातून केली आहे.

१९९८ मध्ये त्यांची मिलिंद विज्ञान महाविद्यालयात अधिव्याख्यातापदी नियुक्ती झाली. २००१ मध्ये त्या अधिव्याख्याता म्हणून विद्यापीठाच्या संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागात रूजू झाल्या. २०१३ मध्ये त्या प्रोफेसर बनल्या. २०१५ पासून त्या विद्यापीठ वसतिगृह क्रमांक २ च्या वॉर्डन म्हणूनही काम पहात आहेत.

 डाटा कॉम्प्रेशन स्पीच प्रोसेसिंग, ह्यूमन कॉम्प्यूटर इंटरॅक्शन, इमोशन रिकग्निशन हे त्यांच्या आस्थेचे आणि अभ्यासाचे विषय असून त्यांच्याकडे परीक्षा व मूल्यमापन मंडळाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे  त्या या विभागाचा विस्कळित झालेला ‘डाटा’ नीटपणे कॉम्प्रेस करून विद्यार्थ्यांचे ‘इमोशन रिकग्निशन’ करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!