केंद्रीय युवक महोत्सवात संयोजन समितीनेच केला लावणीचा पचका, जाचक अटीच्या दंडकामुळे लावणीला ना ठसका, ना ठेका!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात संयोजन समितीच्या दुराग्रहामुळे महाराष्ट्राची शान असलेल्या लावणी या लोकप्रिय लोककला प्रकाराचा अक्षरशः पचका झाला. त्यामुळे एरवी राज्यातील कुठल्याही युवक महोत्सवात जान फुंकून चार चांद लावणारी लावणी या केंद्रीय युवक महोत्सवात निरस, रटाळ आणि अगम्य भक्तीसंगीतात रुपांतरित झाली. त्यामुळे लावणीचा आस्वाद घेण्यासाठी जमलेल्या हजारो रसिक प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

लावणी हा साभिनय श्रृगांर फुलवणारा महाराष्ट्राचा अमिट लोककला प्रकार. मराठमोळ्या नऊवारी साडीत, जुडा टाकून त्यात गजरा, नाकात नथ, हातावर सुंदर ठिपके काढलेली मेहंदी, पायात घुंगराचे चाळ, गळ्यात ठुशी अशा एकदम पारंपरिक रुपामध्ये सादर करण्याचा लोककला प्रकार म्हणजे लावणी. श्रृंगार रसाबरोबरच अध्यात्म, सामाजिक वास्तव मांडण्याचे कामही लावणीने वर्षानुवर्षे केले आहे. ‘कुठं कुठं जायाचं हनीमुनला’, ‘चला जेजुरीला जाऊ’, ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची…’  या अनुक्रमे श्रृंगार, अध्यात्म आणि सामाजिक वास्तव टिपणाऱ्या लावण्या!

परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाच्या संयोजन समितीने मंचावर लावणी ‘लाइव्ह’च सादर केली गेली पाहिजे, असा दंडक घालून दिला. त्यामुळे लावणी सादर करणाऱ्या लावण्यवतींची चांगलीच गोची झाली. अनेक महाविद्यालयांना व्यावसायिक गायक-वादक रग्गड शुल्क मोजून भाडेतत्वावर घेणे परवडत नसल्यामुळे त्यांनी उपलब्ध गायक-वादकांना सोबत घेऊन लावणी सादर करण्याचा प्रयत्न केला.

संयोजन समितीचा ‘लाईव्ह’चा दंडक आणि बहुतांश महाविद्यालयांकडे कुशल गायक-वादकांची वाणवा यामुळे ताल एकीकडे, सूर दुसरीकडे आणि कोरस तिसरीकडेच अशा बेसुर सादरीकरणात मंचावर सादर करण्यासाठी गेलेल्या कलाकाराला नेमका ठेका कुठे धरायचा याचाच अंदाज येत नव्हता. त्यामुळे या विद्यार्थी कलाकारांनी भरपूर परिश्रम घेत तयारी करूनही त्यांना रंगमंचावर अपेक्षित सादरीकरण करताच आले नाही. परिणामी लावणीचा ठसका आणि ठेका काही रंगलाच नाही. त्यामुळे कलाकारांबरोबरच लावणीचा आस्वाद घेण्यासाठी जमलेल्या हजारो रसिक प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला.

दुसरीकडे श्रीमंत महाविद्यालयांनी व्यावसायिक गायक-वादकांना रग्गड शुल्क मोजून हायर केले आणि त्यांच्या संचाच्या मदतीने अनेक कलाप्रकारांची तयारी विद्यार्थी कलावंतांकडून करून घेतली. त्यामुळे या महाविद्यालयांच्या श्रीमंतीच्या झगमगाटाच्या ओझ्याखाली अनेक महाविद्यालये विशेषतः ग्रामीण महाविद्यालयातील विद्यार्थी कलाकार दबून गेले.

या एकूणच प्रकाराबाबत न्यूजटाऊनने महाराष्ट्रातील लोककलांचे जाणकार, तज्ज्ञ, अभ्यासक आणि विद्यार्थी कलाकारांशी चर्चा केली असता संयोजन समितीचा हा दंडक अनेकांना जाचक आणि लोककलांच्या संवर्धनासाठी मारकही वाटला. त्यातून अनेक मुद्दे चर्चेला आले आहे.

‘लाइव्ह’ सादरीकरणाचा दुराग्रह कशासाठी?

युवक महोत्सवासारख्या आयोजनातून केवळ लावणी या लोककला प्रकाराचा पारंपरिक बाज आणि साज टिकला पाहिजे, त्याचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे, हीच जर संयोजन समितीची प्रामाणिक इच्छा आणि उद्देश असेल तर लावणी सादर करणाऱ्या विद्यार्थी कलाकाराने साभिनय श्रृंगार रसाचे सादरीकरण केले की नाही? त्या कलाकाराचा मुद्राभिनय, देहबोली, ठसका आणि ठेका हा पारंपरिक लावणीला साजेसा होता की नाही? या निकषावर लावणीचे परीक्षण केले गेले पाहिजे.

अशा परिस्थितीत लावणीचे ‘लाईव्ह’च सादरीकरण केले गेले पाहिजे, हा दुराग्रह कशासाठी धरला गेला? पारंपरिक लावणी जर रेकॉर्डेड असेल तर ती सादर करण्याची परवानगी का दिली गेली नाही? ‘एक होता विदूषक’सारख्या काही चित्रपटांतील लावण्या रेकॉर्डेड असल्या तरी त्या ‘पारंपरिक लावणी’ च्या पठडीत तंतोतंत बसणाऱ्या आहेत. अशा रेकॉर्डेड लावण्यांना परवानगी का दिली जात नाही?

पारंपरिक लावणीच्या जपणुकीच्या नावाखाली विद्यापीठाच्या सृजनरंग मंचावर ‘सुरात-बेसुरात’ ज्या लावण्या सादर करण्यात आल्या त्यापैकी ९० टक्के लावण्या या पारंपरिक लावणी या प्रकारात मोडणाऱ्याच नव्हत्या. ‘मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा…’ यासारख्या लावण्या पारंपरिक लावणी प्रकारात मोडतात, असे जर संयोजन समितीचे आणि युवक महोत्सवाच्या सल्लागार समितीचेही म्हणणे असेल तर त्यांच्या पारंपरिक लोककलेच्या ज्ञानाचीच झाडाझडती घेण्याची आवश्यकता आहे.

पर्याय द्यायला कोणाची हरकत?

ज्या महाविद्यालयाच्या संघाची लावणीचे लाईव्ह सादरीकरण करण्याची तयारी आणि इच्छा आहे, त्यांना खुशाल लाईव्ह सादरीकरण करण्याची परवानगी द्यावी आणि ज्या महाविद्यालयाच्या संघाला रेकॉर्डेड लावणीवर सादरीकरण करायचे असेल, त्यांना रेकॉर्डेड लावणी सादर करण्याची परवानगी द्यावी. मात्र या दोन्ही प्रकारात ‘लावणी ही पारंपरिक’ या प्रकारातच मोडणारी असली पाहिजे, असा दंडक घालून पर्याय द्यायला काय हरकत आहे? असा पर्याय उपलब्ध करून दिला तर लोककला प्रकाराच्या सादरीकरणासाठी फारशा पायाभूत सुविधा नसलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी कलाकारही ताकदीने सादरीकरण करू शकतील.

प्रशिक्षितांसोबत अप्रशिक्षितांची स्पर्धा

युवक महोत्सवाच्या मंचावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षित विद्यार्थी आणि प्रशिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा अभाव असलेले विद्यार्थी यांच्यात होणारी स्पर्धा हाही एक चिंतेचा विषय आहे. ज्या महाविद्यालयांत संगीत, नाट्यशास्त्र इत्यादी कला प्रकारांचे स्वतंत्र विभाग आहेत आणि त्यासाठी लागणारा अध्यापक वर्ग, यंत्रणाही आहे  अशा महाविद्यालयांचे विद्यार्थी कलाकार हे अशा कला-लोककला प्रकाराच्या प्रशिक्षणाची सुविधा नसलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी कलाकारांच्या स्पर्धेत उरतवले जातात.

परिणामी प्रशिक्षित विद्यार्थी कलाकारांचे संचच युवक महोत्सवाच्या रंगमंचावर भाव खाऊन जातात. सुविधांच्या अभावात कला सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. या अन्याय दूर करण्यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षणाची सुविधा असलेली महाविद्यालये आणि तशी सुविधा नसलेली महाविद्यालये असे दोन स्वतंत्र गट करून त्या-त्या कला-लोककला प्रकारांसाठी दोन स्वतंत्र गटात पारितोषिके ठेवली गेली पाहिजे, अशी विद्यार्थी कलाकारांची मागणी आहे. त्यामुळे सुविधांच्या अभावात कला-लोककलांचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि त्यांचा हुरूपही वाढेल, अशी भावना या युवक महोत्सवात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थी कलाकारांनी न्यूजटाऊनकडे बोलून दाखवली.

…तर हे पारंपरिक लावणीचे दुर्दैवः डॉ. चंदनशिवे

लाइव्ह सादरीकरणाच्या नावाखाली पारंपरिक लावणी म्हणून चित्रपटातील उठवळ लावण्या सादर होत असतील आणि युवक महोत्सवात पारितोषिके दिली जात असतील तर त्यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. लावणी ही पारंपरिक असेल तर ती रेकॉर्डेड असली तरी तिचे सादरीकरण करू द्यायला हरकत नाही. अशा स्थितीत फारफार तर गायन-वादनाचे गुण वगळले जाऊ शकतात, असे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे आणि प्रसिद्ध लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी न्यूजटाऊनशी बोलताना सांगितले.

सूचना चांगली, आवश्य विचार करूः डॉ. मुस्तजीब खान

लावणी या कला प्रकाराच्या सादरीकरणाच्या वेळी त्या त्या महाविद्यालयातील गायक-वादकांनाही संधी मिळाली पाहिजे, हा लावणीचे ‘लाइव्ह’ सादरीकरण करण्याची अट घालण्यामागचा हेतू आहे. परंतु पारंपरिक लावणीच्या सादरीकरणासाठी रेकॉर्डेड किंवा लाइव्ह सादरीकरणाचा पर्याय देण्याची सूचना चांगली आहे. या सूचनेवर आवश्य विचार केला जाईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी न्यूजटाऊनशी बोलताना सांगितले

पण प्रा. दासू वैद्य म्हणतात…

महाविद्यालयातून गायक, वादक, कलाकार निर्माण व्हावे ही त्यामागची भूमिका आहे. युवक महोत्सवात बंद झालेली लावणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक लावणीचाच आग्रह धरायचा तर लावणी बंद करून टाकावी लागेल. अभावग्रस्त महाविद्यालयातील विद्यार्थी आणि संपन्न महाविद्यालायातील विद्यार्थी असे आपण किती दिवस रडत बसणार? त्यांनीही तयारीने उतरले पाहिजे. तुमचे जे काही म्हणणे असेल ते विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांकडे मांडा, असे या युवक महोत्सवाच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा. दासू वैद्य यांचे म्हणणे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!