विनायक मेटेंसारखाच माझा ‘गेम’ करण्याचे कारस्थान, अशोक चव्हाणांचा खळबळजनक आरोप; पोलिसांत केली तक्रार

नांदेडः आपल्यावर मुंबई आणि नांदेडमध्ये खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात असून या व्यक्ती आपला पाठलाग करून आपल्या भेटीगाठी, प्रवासाची माहिती संकलित करत आहेत. त्यामुळे आपला घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी नांदेडच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रारही केली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंसारखेच आपल्यालाही मारण्याचा कट असल्याची भीती चव्हाणांनी व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बोगस लेटरहेड तयार करून अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. हे बोगस लेटरहेड आणि बोगस पत्र तयार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढले पाहिजे, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करित असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशी शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी दखल घेऊन तातडीने कायदेशीरदृष्ट्या योग्य कार्यवाही करावी.’’

अशोक चव्हाण, ज्येष्ठ काँग्रेस नेते

याबाबत अशोक चव्हाण यांनी सविस्तर ट्विट केले आहे. ‘मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. याबाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेड मलाही मिळाले होते,’ असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

बनावट कोरे लेटरहेड मिळाल्यानंतर मी यापूर्वीच नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून चौकशीही सुरू झाली आहे, अशी माहिती स्वतः चव्हाण यांनी दिली.

आज अशाच कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र अशोक चव्हाण यांच्या हाती लागले आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.

 ज्याअर्थी आपल्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले, त्याअर्थी पुढील काळात खोटे दस्तऐवज तयार करून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे अशोक चव्हाण यांनी या तक्रारीत म्हटले आहेत. आगामी काळात अनेक निवडणुका असून राजकीयदृष्ट्या प्रतिमाहनन व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशयही अशोक चव्हाण यांनी या तक्रारीत घेतला आहे.

बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. या बाबीचे गांभीर्य आणि त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी नांदेड पोलिसांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!