नाशिक पदवीधरमधून ‘काँग्रेस बंडखोर’ सत्यजीत तांबे विजयी, ‘मविआ’च्या शुभांगी पाटील पराभूत


नाशिकः सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसमधून बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मतमोजणीच्या पाचव्या फेरी अखेर विजय झाला. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा त्यांनी २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने पराभव केला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसमधील राजकीय नाट्यामुळे सुरूवातीपासूनच रंगतदार बनली होती. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी मुदतसंपेपर्यंत उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना भाजप पाठिंबा जाहीर करेल, अशी अपेक्षा असतानाही शेवटपर्यंत भाजपने उघड पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला ऐनवेळी शुभांगी पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली होती.

या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच सत्यजीत तांबे यांनी आघाडी घेतली होती. पाचव्या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

 सत्यजीत तांबे यांना ६८ हजार ९९९ मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते मिळाली. या चुरशीच्या आणि लक्षवेधी निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी सुमारे २९ हजार ४६५ इतके मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे.

 ..पण विजयोत्सव साजरा करणार नाहीः  नाशिकमधील आपला विजय दृष्टीपथात दिसत असतानाच सत्यजीत तांबे यांनी विजयोत्सव साजरा करणार नसल्याची घोषणा केली . निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करून ही घोषणा केली. विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत. पण विजयोत्सव साजरा करणार नाही. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय. त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे. त्यामुळे कोणीही घाई करू नये, ही विनंती, असे सत्यजीत तांबे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!