लोकसभा निवडणुकीची लिटमस चाचणीः मध्य प्रदेश, तेलंगणसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर


नवी दिल्लीः  भारतीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यात होऊ घातलेल्या या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहेत. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने जाहीर केले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, मिझोराममध्ये मध्ये ७ नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात १७ नोव्हेंबरला तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला मतदान होईल. तेलंगणमध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.

या पाचही राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पाच राज्यांतील ६७९ विधानसभा मतदारसंघात सुमारे १ लाख ७७ हजार मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि बिगरभाजप राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली इंडिया आघाडी यांच्यात पहिल्यांदाच थेट लढत होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी इंडिया या दोघांसाठी या निवडणुका महत्वाच्या ठरणार आहेत.

जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आणि अँटी-इन्कम्बन्सी हे घटक या पाच राज्यांतील निवडणुकीच्या केंद्रस्थानी रहाण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!