नवी दिल्लीः आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी१० जानेवारीला दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून नार्वेकर यांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. शिंदेंची शिवसेनाच खरी शिवसेना ठरवण्याच्या आणि फुटीर शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नार्वेकरांच्या निर्णयास या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मे २०२३ मध्ये आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. मर्यादित कालावधीत निकाल द्या, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करू शकले नाहीत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना १० जानेवारीपर्यंत निकाल देण्याची मुदत दिली होती. त्यानुसार नार्वेकरांनी १० जानेवारी रोजी निकाल दिला.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले परंतु खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला मान्यता दिली. या निर्णयाच्या विरोधात आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दाद ठोठावले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली असून नार्वेकरांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला, असा दावा ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि फुटीर शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देण्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयात २०१९ मधील शिवसेनेची घटना दुरूस्ती अवैध ठरवत उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच अमान्य केले. तसेच १९९९ ची पक्षघटना आणि बहुमताच्या आधारे शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. शिंदे गटातील १६ आमदारांना पात्र ठरवण्याबरोबरच ठाकरे गटातील १४ आमदारांनाही त्यांनी पात्र ठरवले. नार्वेकरांचा हा निर्णय घटनातज्ज्ञांना आश्चर्यकारक वाटला.
विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून न्याय मिळाला नाही, असे वाटल्यास याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय देण्याची जबाबदारी नार्वेकरांकडे सोपवताना म्हटले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दाद ठोठावले आहे.
ठाकरे गट काढणार उद्या निकालाचे वाभाडे
दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्या दिलेल्या निकालावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने उद्या १६ जानेवारी रोजी महापत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेला देशभरातील पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले असून या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित चर्चा करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.