जनसुरक्षा कायदा ही अघोषित आणीबाणी, एके-४७ ची पूजा करणाऱ्या मोदी-भागवतांनाही ‘अर्बन नक्षल’ ठरवणार का?: प्रकाश आंबेडकरांचा सवाल


मुंबईः महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा ही ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एके-४७ आणि टॉमी गन यासारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटे सगळीकडे उपलब्ध आहेत. सरकार त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार आहे का? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर झाले आहे. आता राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. या मुद्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी आहे. या कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तिच गोष्ट भाजपने जनसुरक्षा कायद्याच्या रुपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता. आता त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदी- भागवतांना ‘अर्बन नक्षल’ ठरवणार का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एके-४७ आणि टॉमी गन यासारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत. भारतीय सैन्यात विशिष्ट सैनिकांनाच ही शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे. असे असताना आरएसएसकडे ही शस्त्रे कुठून आली? सरकार त्यांच्यावर अर्बन नक्षल म्हणून कारवाई करणार आहे की नाही?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

…हे राज्य उलथवून टाकण्यासारखे

ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत, त्यांच्यावर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे की नाही? कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसा एके-४७ आणि टॉमी गन यासारखी शस्त्रे बाळगणे हाही कायद्यान्वये गुन्हा आहे. हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे. आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगते, त्यांच्याविरोधात जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आधी कारवाई करा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 ज्यांच्याकडे शस्त्रे, दारूगोळा आहे, त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवू शकता. कारण ते बेकायदेशीर मार्गाने राज्याला उलथवून टाकू पाहत आहेत. बेकायदेशीर मार्गाने जमवलेली शस्त्रे, दारूगोळा आरएसएसवाल्यांकडे आहे. त्यांनी तो सार्वजनिकरित्या जाहीर केला आहे. त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाची कारवाई करणार आहात का? हा मोठा प्रश्न असल्याचे आंबेडकर म्हणाले.

मोर्चालाही अर्बन नक्षलवाद म्हणणार का?

कामगारांच्या मोर्चाला अर्बन नक्षलवाद म्हणणार का? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला तर त्यालाही तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का? शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्यालाही तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? खासगी सावकारांच्या विरोधात कारवाई करा, ही मागणी केल्यावर त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? सरकार नेमके कोणाला अर्बन नक्षलवादी ठरवणार आहे?, असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केले आहेत.

…तरच तुम्ही खरे विरोधक

जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही. लोकांनी समाज माध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही त्यांची नौटंकी आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाने आरएसएसच्या शस्त्र, दारूगोळ्याची मोहन भागवत, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस पूजा करतायत, या विरोधात न्यायालयात दाद मागितली आणि यांना अर्बन नक्षलवादी जाहीर करा, अशी मागणी केली तर त्या माणसाच्या मागे सर्व विरोधी पक्षांनी उभे राहिले पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने विरोधक आहात हे दिसेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!