मुंबईः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी बुधवारी सायंकाळी ५ वाजता थंडावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदींची किमया चालली नसल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’चे नारे देत हिंदूचे कार्ड चालवण्याचा प्रयत्न केला. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध करूनही भाजपने निवडणूक प्रचार काळात हे दोन नारे रेटून नेले. आता भाजपने बाहेर काढलेले हिंदू कार्ड महाराष्ट्रात चालणार का? याचा फैसला बुधवारी मतदार करणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये असलेल्या लढतीत या दोन आघाड्यांना पर्याय म्हणून परिवर्तन आघाडी, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरेंची मनसे हे राजकीय पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या निवडणूक प्रचार काळात महाविकास आघाडीने प्रामुख्याने विकासाच्या मुद्यांवर जोर दिला. सोयाबीन-कापसाच्या भावापासून ते शेतकरी कर्जमाफी योजनेपर्यंतचे मुद्दे महाविकास आघाडीने प्रचारात रेटले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढून मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदींची प्रतिमा आणि किमया भाजपच्या कामी आली नाही. विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील मतदार तोच कित्ता गिरवण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तोंडून ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देत मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदू कार्ड फेकले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा देऊन पुढचे पाऊल टाकले.
भाजपच्या या दोन्ही घोषणांवर महाविकास आघाडीकडून जोरदार टिकास्त्र सोडले जात असतानाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही, म्हणत विरोध दाखवला. तरीही भाजपने हिंदू कार्ड रेटण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास धर्मांतरविरोधी कायदा लागू करू, अशी घोषणाही भाजपने केली. महाविकास आघाडीची सत्ता आली तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा कब्जा बसेल, असेही शेतकऱ्यांना प्रचारसभांमधून सांगण्याचा प्रयत्न भाजपने केला.
भाजपच्या सूत्रांच्या मते, पक्षाच्या जात आणि शेतकऱ्यांचे मुद्दे निकाली काढण्याच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कृषी क्षेत्रातील कल्याणकारी योजनांमुळे शेतकऱ्यांचा रोष कमी होईल, असे आम्हाला वाटले होते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती.
आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाचा रोष संपुष्टात येईल, असा भाजपचा अंदाज होता. परंतु मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे आरक्षण राजकारण कुचकामी ठरवून टाकले. कोणालाही पाठिंबा न देण्याचा जरांगे पाटलांचा निर्णय महाविकास आघाडीला अधिक फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे.
मराठा मतांची विभागणी टळून ही मते महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर हुकमी एक्का म्हणून भाजपने बाहेर काढलेले हिंदू कार्ड महाराष्ट्रात चालणार का? की भाजपसाठी हे हिंदू कार्ड मोठा व्होट कटिंग फॅक्टर ठरणार? हे बुधवारी होणाऱ्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.