नागपूरः राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री काटोल मतदारसंघात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर काटोल येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे देशमुखांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी काटोल पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.
अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) उमेदवार आहे. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनिल देशमुख दिवसभर प्रचारात होते. नरखेड येथील सभा संपल्यानंतर देशमुख हे तीनखेडा-बिष्णूर रस्त्याने काटोलकडे परतत असताना काटोल-जलालखेडा रस्त्यावरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत देशमुख हे गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर देशमुखांना तातडीने काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे देशमुखांच्या सुरक्षेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. देशमुखांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्यांची ओळख अदयाप पटलेली नाही. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या हल्ल्यात देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात अनिल देशमुख हे रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसून येत आहे. हल्ला करणारे हे भाजपचे लोक आहेत, असे बोलतानाही अनिल देशमुख दिसत आहेत.
काही प्रवृत्तींना…शरद पवारांची प्रतिक्रिया
अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निषेध केला आहे. ‘अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. काटोलमध्ये ज्या पद्धतीचा लोकांचा अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला प्रतिसाद मिळत आहे, हे काही प्रवृत्तींना सहन होत नाही. आज अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या डोक्याला लागले आहे. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप ठिक आहे, मात्र अशा प्रकारचा हल्ला करणे हे अयोग्य आहे. याचा मी निषेध करतो’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
निवडणुकीत हल्ला करणारी मानसिकता कधीही नव्हतीः सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शप) नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनीही या घटनेचा निषेध करत भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. ‘प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला, ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे, पण भाजपच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध,’ असे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.