डॉ. निखिल गुप्ता यांची बदली, मनोज लोहिया औरंगाबादचे नवे पोलिस आयुक्त


औरंगाबादः  राज्य सरकारने सोमवारी अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात औरंगाबादचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी पिपंरी चिंचवडचे सहपोलिस आयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादच्या किराडपुरा भागात उसळलेल्या दंगलीप्रकरणी डॉ. निखिल गुप्ता यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. किराडपुरा भागातील दंगल चिघळण्यास पोलिस प्रशासन आणि पोलिस आयुक्त गुप्ता हेच जबाबदार असल्याचा आरोपही या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे केला होता.

औरंगाबाद पोलिसांकडून अवैधधंदे चालू देण्यासाठी हप्ते वसुली सुरू असून महिन्याला ६० ते ८० लाख रुपये औरंगाबाद शहर पोलिस हप्त्यापोटी वसुली करतात, असा आरोप दानवे यांनी केला होता. दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडून सुरू असलेल्या संपूर्ण हप्ते वसुलीची यादीच माध्यमांसमोर जाहीर केली. त्यामुळे खळबळ उडाली. राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून दानवे यांनी तशी तक्रारही केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्या यादीत डॉ. निखिल गुप्ता यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्या जागी मनोज लोहिया यांना आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

निखिल गुप्ता यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढले जाणार असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

डॉ. निखिल गुप्ता यांच्या कारकिर्दीतील शेवटचा काळ वादग्रस्त ठरला आहे. त्यांच्या कार्यकाळात शहराची कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा भागात उसळलेल्या दंगलीमुळे डॉ. गुप्ता हे राजकीय नेत्यांच्या निशाण्यावर आले होते.

गुप्ता यांच्या ठिकाणी बदलून आलेले मनोज लोहिया यांनी मराठवाड्यात अनेक ठिकाणी काम केले आहे. औरंगाबादचे सहायक पोलिस आयुक्त, औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. परभणीचे पोलिस अधीक्षक आणि नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण विशेष पोलिस महानिरीक्षक

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) पदावर त्यांना पाठवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी मुंबईचे अपर पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांना नियुक्ती देण्यात आली आहे. डॉ. चव्हाण यांनीही सुमारे १८ वर्षांपूर्वी औरंगाबादेत सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांनी मराठवाड्यातील जालना, लातूरमध्येही कर्तव्य निभावले आहे. मराठवाडा विभागाची त्यांना चांगली माहिती आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!