धुळेः अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक, कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या, विचारवंत सरोज कांबळे यांचा ५ जून २०२३ रोजी धुळ्यात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल संशय आल्यामुळे एका कार्यकर्त्याने पोलिसांना केलेल्या विनंतीवरून सरोज कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र तो शवविच्छेदन अहवाल गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे सरोज कांबळे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरोज कांबळे यांनी कॉम्रेड शरद पाटील यांच्या चळवळीतील कार्यकर्ते प्रा.रणजित परदेशी यांच्यासोबत आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केला होता. सरोज कांबळे या बॅंकेत उच्चपदस्थ अधिकारी होत्या. त्यांनी जाती व्यवस्था आणि भारतीय स्त्रीमुक्तीची दिशा, स्त्रीमुक्ती मागोवा आदी महत्वाचे ग्रंथ लेखन केले आहे. धुळ्यात व येवला येथे सरोज कांबळे यांनी सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीसाठी मोठे योगदान दिले आहे. अनेक कार्यकर्ते घडवले.
सरोज कांबळे या कॉ. शरद पाटील यांच्या मार्क्स, फुले, आंबेडकर विचारांच्या वारसदार होत्या. तो विचार महाराष्ट्रातील तरूणांमध्ये आपल्या लेखणी आणि बोलीतून पोहोचवण्याचे काम सरोज कांबळे यांनी केले. सरोज कांबळे या कॉ. शरद पाटील यांच्या सान्निध्यात घडलेल्या सत्यशोधक कम्युनिस्टांच्या पिढीतील प्रतिनिधी होत्या. या पिढीने महाराष्ट्रातील परंपरागत मार्क्सवाद्यांपुढे वैचारिक आव्हान उभे केले. फुले-आंबेडकरांशिवाय नुसता मार्क्स बोलण्यात अर्थ नाही, हे या पिढीने ठासून सांगितले.
नेमके काय घडले?
५ जून रोजी धुळे येथे सरोज कांबळे मृत्यू पावल्या. त्यांचे पती प्रा. रणजित परदेशी, मुलगा ईनायत परदेशी घरात होते. प्रा.रणजित परदेशी हे सध्या गंभीर आजारी आहेत. मुलगा ईनायत याने ६ जून रोजी पहाटे सरोज कांबळे यांचा अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला.
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज कांबळे यांच्या मृत्यूबद्दल संशय आल्यामुळे सचिन सोनवणे या कार्यकर्त्याने पोलिसांना कळवले. प्रारंभी पोलिसांनी हे कौटुंबिक प्रकरण असल्यामुळे सरोज कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. परंतु सोनवणे यांनी रेटा लावल्यामुळे पोलिस घटनास्थळी आले. त्यावेळी सरोज कांबळे यांच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती आणि त्यांचा मृतदेह शववाहिनीवर ठेवण्यातही आला होता.
तेथे असलेल्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला शवविच्छेदन करायचे नाही, तुम्ही निघून जा, असे पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील कार्यकर्ते आणि सचिन सोनवणे यांच्यात बाचाबाचीही झाली. नंतर सचिन सोनवणे यांनी पोलिस अधीक्षकांना फोन करून विनंती केल्यानंतर पोलिसांनी सरोज कांबळे यांचा मृतदेह शववाहिनीवरून खाली उतरवून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
तो शवविच्छेदन अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. शवविच्छेदनानंतर ६ जून रोजी सरोज कांबळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दफ्तरी सचिन सोनवणे यांची नोंद असून पोलिसांनी त्यांचे छायाचित्रही काढून घेतले आहे.
शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी पुढे कुठलाही तपास केला नाही. हे प्रकरण कौटुंबिक आहे, कुणाचीही तक्रार नाही, असे सांगत पोलिस पुढील तपास करायला तयार नाहीत. सरोज कांबळे यांना नैसर्गिक मृत्यू आला असता तर सचिन सोनवणे किंवा कुठल्याही कार्यकर्त्याने त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरला नसता. ज्या अर्थी सचिन सोनवणे हा कार्यकर्ता शवविच्छेदन करण्यावर अखेरपर्यंत ठाम राहिला, त्याअर्थी सरोज कांबळे यांचा मृत्यू खरेच नैसर्गिक होता काय? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे.
मृत्यूपूर्वी सायंकाळी घरातून सरोज कांबळे यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. सरोज कांबळे यांच्या मृत्यूनंतर आईला देहदान करायचे होते, असे सांगत त्याच दिवशी मुलगा इनायत याने ऍम्बुलन्सही बोलावली होती. परंतु तेथील कार्यकर्त्यांनी आपण विरोध केल्यानंतर ती ऍम्बुलन्स परत पाठवून देण्यात आली, असेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
सरोज कांबळे या गेल ऑम्वेट या तोडीच्या विचारवंत, नेत्या होत्या. मात्र डाव्या चळवळीतही जातजाणीव काम करत असल्याने सरोज कांबळे यांची उपेक्षा झाली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणीही डफ वाजवून, क्रांतिकारी गाणी गाऊन त्यांना क्रांतिकारी अभिवादन करून शेवटचा निरोपही दिला नाही. त्यांच्या अंत्यविधिला डाव्या चळवळीतील मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.
सरोज कांबळे या अत्यंत दहशतीखाली वावरत होत्या. काही महिन्यापूर्वी त्या धुळे येथील राहत्या घरातून ‘बेपत्ता’ झाल्या होत्या. त्यांचा मुलगा ईनायत परदेशी याने पोलीस ठाण्यात आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी येवला येथे एका नातेवाईकांकडे आश्रय घेतला होता आणि त्या घरी जाण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या.
सरोज कांबळे या नेमके कुणाच्या दहशतीखाली घरातून निघून गैल्या होत्या? दहशतीखाली घर सोडलेल्या सरोज कांबळे या आपल्या घरी परत का गेल्या? त्यांना घरी कोणी आणले? ५ जूनच्या रात्री नेमके काय घडले? सचिन सोनवणे आणि शेजारी राहणाऱ्या लोकांनी सरोज कांबळे यांच्या मृत्यूबद्दल संशय का घेतला? या संदर्भात कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी काहीच भूमिका का घेतली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.