भारताच्या ‘चांद्रयान-३’ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे मारली एन्ट्री,  इस्रो इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर!


श्रीहरीकोटाः भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-३ ने तब्बल २२ दिवसांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी (५ ऑगस्ट) ७ वाजून १५ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हजेच इस्रोच्या तिसऱ्या चांद्र मोहिमेतील हा अतिशय महत्वाचा टप्पा होता. १६ ऑगस्टपर्यंत चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत भ्रमण करणार असून त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता चांद्रयानाचे ऑर्बिट कमी केला जाईल. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधी एकूण ४ वेळा त्याचे ऑर्बिट बदलले जाणार आहे. इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ हे ४२ दिवसांचा प्रवास करून चंद्रावर उतरणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

चांद्रयान-३ मोहिमेत लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. १६ ऑगस्टपर्यंत हे चांद्रयान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी लँडर प्रोपल्शनपासून वेगळे होईल. ते चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणारी रेंजची माहिती घेईल. तर लँडर पुढे जात २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश हा चांद्रयान मोहिमेतील महत्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आता चांद्रयान-३ मोहिमेतील पुढचे १७ दिवस महत्वाचे ठरणार आहेत. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता असल्यामुळे हा इस्रोच्या इतिहासातील महत्वाचा दिवस ठरणार आहे.

 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर रोव्हर प्रयोगासाठी लँडरमधून बाहेर येईल आणि पुढचे ३ ते ६ महिन्याच्या काळात ते चंद्रावर विविध प्रयोग करणार आहे. लँडर सुरक्षितरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले की नाही, याची शहनिशा करण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत. रोव्हरचे वजन १ हजार ७४९ किलोग्राम आहे. त्यात साईड माऊंटेंड सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगवर लक्ष असणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे. इस्रोची ही मोहीम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. इस्रोने २००८ मध्ये चांद्रयान-१ मोहीम सुरू केली होती. गेल्या पंधरा वर्षांच्या काळातील इस्रोची ही तिसरी चांद्र मोहीम आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *