पुणेः राज्यात डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत राज्यभरात १ लाख ८७ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. डोळे येण्याच्या साथीचे सर्वाधिक रुग्ण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाने ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागात सर्वेक्षण करून उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोळे येण्याच्या साथीचे सर्वाधिक ३० हजार ५९२ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यात १२ हजार १३९, अमरावती जिल्ह्यात १० हजार ७१०, पुणे जिल्ह्यात १० हजार ५३१ आणि अकोला जिल्ह्यात १० हजार १३२ रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागाबरोबरच महानरातही डोळे येण्याची साथ वेगाने पसरू लागली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत ३ हजार ५५१ रुग्ण आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत १ हजार ३१७ रुग्ण तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत १ हजार १९५ रुग्णांचे डोळे आल्याचे आढळले आहे.
लक्षणेः एंटेरो विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात डोळे येण्याची साथ पसरली असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. डोळे लाल होणे, डोळ्यात काही तरी खुपत असल्यासारखे वाटणे, डोळ्यातून वारंवार पाणी येणे आणि डोळ्यांना सूज येणे ही डोळे येण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. जास्त त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले असते.
एकमेकांकडे पाहिल्याने पसरत नाही साथः अनेकदा कोणाचे डोळे आले की आपण त्यांच्यापासून दूर राहतो किंवा त्या व्यक्तीला गॉगल किंवा चष्मा वापरण्यास सांगतो. एकमेकांकडे पाहिल्याने डोळ्यांचा संसर्ग होतो, असा आपला गैरसमज आहे. मात्र आपले हात डोळ्यांना लागतात आणि हेच हात दुसऱ्या व्यक्तीला लागले तरच डोळे येण्याच्या साथीचा संसर्ग पसरतो.
अशी घ्या काळजीः डोळे येण्याच्या साथीवर सतत डोळे आणि स्वच्छ धुणे हा एकमेव उपाय असतो. डोळे आलेल्या व्यक्तीने हात स्वच्छ ठेवावे. डोळ्यांना हात अजिबात लावू नये. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल वापरावा. चुकून हात डोळ्यांना लागला तर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. स्वच्छतेची काळजी हाच डोळे येण्याच्या साथीवरील रामबाण उपाय आहे.
घरात कापूर जाळून करा धुरीः डोळे येण्याची साथ तुमच्या आसपास आलेली असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला जातो. कापूर किटाणू आणि विषाणू नष्ट करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय आहे. घरात कापूर जाळून त्याची धुरी केल्याने घराच्या वातावरणातील किटाणू आणि विषाणू नष्ट होतात. कापूर जाळून धुरी केल्याने डोळ्यातील घाण अश्रूवाटे बाहेर पडण्यास मदत होते आणि डोळे स्वच्छ होतात.