मुंबईः लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायला अजून वेळ असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार आणि महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाने हा दावा फेटाळून लावला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. उलट शिंदे सेनेमुळे महाराष्ट्रात भाजपविरोधात वातावरण तयार झाले, त्यामुळे भाजप नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे गेलो तर त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होतील आणि त्यांच्या जागी महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेने मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आमची महायुती मजबूत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खंबीर आहेत. मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेत तथ्य नसून आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच मुख्यमंत्री असतील आणि ते जोमाने राज्य कारभार करतील, असे शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे.
काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते. मुख्यमंत्री खंबीर आहेत. निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याची सुतराम शक्यता नाही. दिवसाचे २४ तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही, असे आ. शिरसाठ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दलित मतदार विचलित
इंडिया आघाडीने निवडणुकीसाठी रणनीती ठरवली होती. त्यांनी राज्य घटना बदलणार हा मुद्दा घेतला. दलित समाज आपल्या बाजूने आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या मुद्याने दलित समाज विचलित झाला खरा, पण त्याचा परिणाम एनडीएवर होणार नाही. लोकांना समज आहे, त्यांनी योग्य ते मतदान केले आहे. येणारे सरकार हे एनडीएचेच असणार आहे, असा दावाही आ. शिरसाठ यांनी केला आहे.